इस्लाम धर्म स्वीकाराल तर वाचाल, इंग्लंडमधील मुस्लिम विद्यार्थ्यांची वर्गातील हिंदू विद्यार्थ्यांना धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रिटनमधील शाळांमध्ये मुस्लीम विद्यार्थी आपल्या हिंदू वर्गमित्रांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणत असल्याचं वृत्त आहे. ब्रिटीश माध्यमांनी यासंबंधीची वृत्त प्रसारित केली आहेत. मुस्लीम विद्यार्थी हिंदू विद्यार्थांना रॅगिंगपासून सुटका होण्यासाठी आपल्या धर्म बदलण्यास सांगत आहेत.

हेन्री जॅक्सन सोसायटीने या प्रकरणी आपला अहवाल द टेलिग्राफ या वृत्तसंस्थेतर्फे प्रकाशित केला आहे. त्यात त्यांनी हे धक्कादायक निरीक्षण नोंदवलं आहे. हिंदुस्थानात सध्या जी राजकीय, सामाजिक, धार्मिक परिस्थिती आहे, त्यासाठी हिंदु विद्यार्थ्यांना जबाबदार ठरवलं जात असून त्यांना इतर धर्मीय विद्यार्थ्यांकडून तिरस्काराची वागणूक मिळत आहे. अशा घटना सप्टेंबर 2022मध्ये लिसेस्टरमध्ये झालेल्या दंग्यानंतर अधिक घडू लागल्या.

हेन्री जॅक्सन सोसायटीने याबाबत संपूर्ण ब्रिटनभरातील 1 हजारहून अधिक शाळांचं सर्वेक्षण केलं. त्यात सुमारे 988 हिंदू पालकांशी संवाद साधण्यात आला. त्यावेळी ब्रिटीश शाळांमध्ये शिकणाऱ्या हिंदू मुलांच्या पालकांपैकी जवळपास 50 टक्के पालकांनी शाळेत हिंदूविरोधी वागणूक मिळाल्याचं कबूल केलं. गंभीर म्हणजे फक्त 1 टक्क्याहून कमी शाळांनी गेल्या पाच वर्षांत हिंदू विरोधी घटनांची माहिती दिली आहे. यापैकी एका घटनेत हिंदू विद्यार्थ्यावर गोमांसही फेकण्यात आलं. ब्रिटनमध्ये हिंदू धर्मियांची संख्या सुमारे दहा लाख इतकी असून तो ब्रिटनमधला तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे. असं असूनही हिंदूविरोधी वातावरण असल्याचं अहवालाचं निरीक्षण आहे.

सप्टेंबर 2022मध्ये लिसेस्टरमध्ये झालेल्या दंग्यानंतर अशा प्रकारच्या वागणुकीत वाढ झाली आहे. मुस्लीम विद्यार्थी हिंदु धर्मीय विद्यार्थ्यांना काफिर असं संबोधत असून त्यांच्यावर इस्लाम स्वीकारण्याचा दबाव आणला जात आहे. इस्लाम न स्वीकारल्यास ते काफिराप्रमाणे नरकात सडतील, असं सांगितलं जात आहे. त्यासाठी मुलांचं रॅगिंगही केलं जात आहे. हिंदू धर्म हा निष्फळ असून त्यांनी धर्मांतरित व्हावं यासाठी मुस्लीमच नव्हे तर ख्रिश्चन धर्मीयही हिंदू विद्यार्थ्यांना धमकावत असल्याचं धक्कादायक चित्र या अहवालाने मांडलं आहे.