
विनाशकारी रिफायनरी प्रकल्पाविरोधात सुरू असणारे आंदोलन पोलिसी दडपशाहीने चिरडण्याचा प्रयत्न करणारे ‘ईडी’ सरकार आता लोकप्रतिनिधींविरोधातही बळाचा वापर करू लागल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले. प्रकल्पविरोधी आंदोलकांची शिवसेना खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी शिवसैनिकांसह भेट घेतली. मात्र आज आंदोलनात सहभागी होत असताना खासदार विनायक राऊत यांना रोखून पोलिसांनी ताब्यात घेतले. जनतेचे प्रश्न आणि जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा देत सरकारने राज्यात सर्व ठिकाणी सुरू असलेली दडपशाही थांबवायला हवी, असेही ते म्हणाले. बारसूतील आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमाराचा आदित्य ठाकरे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला.




























































