‘काकासाहेब म्हस्के हे खरेखुरे आयडॉल’, माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे-पाटील यांचे मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माजी आमदार काकासाहेब म्हस्के यांचे शिक्षण, आरोग्य, शेती, पाणी, दुष्काळासह विविध प्रशांवरील कार्य अतुलनीय असे आहे. त्यांचे विचार आणि कार्य आजच्या पिढीला प्रेरणादायी असेच आहेत. आजच्या तरुणाईपुढे कोणाला हिरो मानावं किंवा आयडॉल्स मानावं असा प्रश असून काकासाहेब हे खरेखुरे आयडॉल असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे-पाटील यांनी केले.

कि.बा उर्फ काकासाहेब म्हस्के यांच्या जयंतीनिमित्त नागापूर-बोल्हेगाव येथील काकासाहेब म्हस्के शैक्षणिक संकुलात आयोजित काकासाहेब म्हस्के स्मृती पुरस्कार सोहळ्याप्रसंगी कोळसे पाटील बोलत होते. यावेळी संस्थेचे कार्यकारी विश्वस्त डॉ.सुभाष म्हस्के, डॉ.सुमती म्हस्के, डॉ.अभितेज म्हस्के, डॉ.दिप्ती ठाकरे, सीईओ समीर ठाकरे, ॲड.श्रीकांत पाटील, ॲड.राहुल म्हस्के, काकासाहेब म्हस्के होमिओपॅथी कॉलेजच्या प्राचार्या निलिमा भोज, काकासाहेब म्हस्के फार्मसी कॉलेजचे प्राचार्य रविंद्र हनवते, पार्वतीबाई म्हस्के नर्सिंग इन्स्टट्यिुटचे प्राचार्य अजित चवरदार यांच्यासह पुरस्कारार्थी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

कोळसे पाटील पुढे म्हणाले की, देशाच्या प्रगतीत डॉक्टरांचे आणि वैद्यकीय क्षेत्रात मोठे योगदान असून कोरोना काळात त्यांनी दिलेली सेवा जीवनदायी ठरली. या संकुलात गोरगरिब आणि सर्वसामान्यांची मुले वैद्यकीय शिक्षण घेवून ग्रामीण भागात आरोग्य सेवा देत आहेत ही अभिमानाची बाब आहे. त्यांची सेवा हीच काकासाहेबांना खऱ्या अर्थाने श्रध्दांजली असल्याचे ते म्हणाले.

यावेळी डॉ.सुभाष म्हस्के म्हणाले की, काकासाहेब म्हस्के यांच्या विचारांचा वारसा समृध्दपणे पुढे नेण्याचे काम त्यांच्या तिसऱ्या पिढीच्या माध्यमातून घडत आहे. हा वारसा असाच व्रतस्थपणे सुरु राहील अशी ग्वाही देत समाजाच्या उन्नतीसाठी राजकारणविरहीत असे कार्य काकासाहेब म्हस्के यांनी केले असून या संकुलातून हजारो विद्यार्थी आरोग्य क्षेत्रात आपले योगदान देत आहेत. ही बाब मनाला सुखद आणि समाधानाची वाटत असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ.म्हस्के यांनी केले तर आभार प्राचार्या भोज यांनी मानले.

याप्रसंगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांचा समाजभूषण, आंतरराष्ट्रीय वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ.केतकी म्हस्के यांचा आरोग्यभूषण, हुतात्मा गेणु प्रसारक मंडळाचे सचिव कुशल भापसे यांचा शिक्षणभूषण, जेष्ठ साहित्यीक रतनलाल सोनग्रा यांचा साहित्यभूषण आणि जेष्ठ पत्रकार मिलिंद देखणे यांचा वृत्तभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. तसेच यंदा जलतज्ञ कै.भास्करराव म्हस्के जलसंधारण पुरस्काराने पाणी फौंडेशनचे नगर तालुका समन्वयक दिलीप कातोरे यांना प्रोत्साहनपर २१ हजार रुपये देवून सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर कु.रुची ठाकरे यांची लंडन येथील किंग्जस्टन विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला.

वाशी मार्केटला काकासाहेब म्हस्के यांचे नाव द्यावे : कोळसे पाटील
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे काकासाहेब म्हस्के चेअरमन असताना वाशी येथील विस्तीर्ण जागेत बाजार समितीचे स्थलांतर करण्यात आले. नगरच्या या भूमिपुत्राने आपल्या कार्यकाळात सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांचे नाव या बाजार समितीला देण्याचे ठरले, तसा ठरवाही झाला. आज मात्र तो ठराव सापडत नाही ही शोकांतिका असून त्यांच्या कार्याचे दखल घेत त्यांचे नाव देणे गरजेचे असल्याचे कोळसे पाटील म्हणाले.