
‘मोनो’, मेट्रो रेल्वेच्या महाकाय लोखंडी खांबांमुळे बाप्पाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये विघ्न असल्याचे समोर आले आहे. आग्रीपाडा येथे भूमिगत मेट्रो रेल स्थानकाच्या कामामुळे वरील रस्त्याची दुरवस्था झाली असून आगमन-विसर्जनात अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी जातीने लक्ष घालत बाप्पाचे आगमन व विसर्जन सुरळीत होईल याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी मुख्यमंत्री, पालिका आयुक्त, एमएमआरडीएला निवेदन देऊन केली आहे.
मुंबईतील लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गणेशगल्ली, रंगारी बदक चाळ, काळाचौकीचा महागणपती, डिलाईल रोडचा राजा व अन्य मंडळांनी समन्वय समितीच्या असे निदर्शनास आणले आहे की, आर्थर रोड येथील सात रस्ता, मोनो रेल्वे स्टेशन येथे काही लोखंडी खांब खूपच कमी उंचीवर उभारण्यात आले आहेत. या खांब्याखालून आगमन व विसर्जन मिरवणुकीस अडथळा निर्माण होणार आहे. त्यामुळे लालबाग, लोअर परळ, काळाचौकी इत्यादी विभागातील गणेशमूर्ती आगमन-विसर्जन या मार्गाने जाऊ शकत नसल्याचे समितीने निदर्शनास आणून दिले आहे.
आगमन-विसर्जनात अपघात होण्याची भीती
सातरस्ता ते आग्रीपाडा पोलीस स्टेशन या भागात सुरू असलेल्या भूमिगत मेट्रो स्टेशनच्या वरील रस्ता खूपच खराब व निकृष्ट दर्जाचा असल्याने खेतवाडी, गिरगाव विभागातील श्री गणेशाच्या मूर्तींचे आगमन येथून झाल्यास अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


























































