
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार धनुष सध्या एका मोठ्या कायदेशीर वादात अडकला आहे. २०१६ मध्ये सुरू झालेल्या मात्र पूर्ण न होऊ शकलेल्या एका चित्रपट प्रकल्पामुळे ‘थेनांडल फिल्म्स’ (Thenandal Films) या प्रसिद्ध प्रोडक्शन हाऊसने धनुषला कायदेशीर नोटीस बजावली असून २० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
काय आहे प्रकरण?
वर्ष २०१६ मध्ये धनुषने थेनांडल फिल्म्ससोबत एका चित्रपटासाठी करार केला होता. या चित्रपटाचे नाव ‘नान रुद्रन’ असे असल्याचे समजते. या प्रकल्पासाठी धनुषने मोठी रक्कम आगाऊ (अॅडव्हान्स) घेतली होती. मात्र, ठराविक काळ उलटूनही या चित्रपटाचे काम पूर्ण झाले नाही. प्रोडक्शन हाऊसचा असा आरोप आहे की, धनुषने या चित्रपटासाठी दिलेला शब्द पाळला नाही आणि इतर प्रोजेक्ट्सना प्राधान्य दिले, ज्यामुळे चित्रपट अर्धवट राहिला.
मिळालेल्या माहितीनुसार, थेनांडल फिल्म्सने धनुषला पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, चित्रपट रखडल्यामुळे कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी धनुषने २० कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. यावर उत्तर देण्यासाठी आणि तोडगा काढण्यासाठी अभिनेत्याला केवळ एका आठवड्याचा वेळ देण्यात आला आहे. जर या काळात समाधानकारक उत्तर मिळाले नाही, तर पुढील कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही निर्मात्यांनी दिला आहे.


























































