Nagpur news – काटोलमध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट; 15 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात येणाऱ्या राऊळगाव जवळ स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये डिटोनेटरचा भीषण स्फोट झाला आहे. रविवारी सकाळी सातच्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती मिळाली असून यात 15 जणांचा मृत्यू झाला, तर 18 जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व मृत आणि जखमी महिलाच असल्याचे कळते. ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी याला दुजोरा दिला. जखमींना उपचारांसाठी नागपूरला हलवण्यात आले आहे. 18 पैकी 10 जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

दरम्यान, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाकडून स्फोटाची माहिती घेतली असून तात्काळ मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

प्राथमिक माहितीनुसार, रविवारी सकाळी सातच्या सुमारास राऊळगाव जवळील एसबीएल या स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट झाला. या कंपनीमध्ये खाणींमध्ये खोदकामासाठी लागणारी डिटोनेटर , स्लरी एक्सप्लोसिव, कास्ट बूस्टर, सिस्मिक एक्सप्लोसिव्स आणि इतर स्फोटकं बनवली जातात. सकाळच्या सुमारास कामगार डिटोनेटर बनवण्याची प्रक्रिया करत असताना अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे आसपासच्या भागातील घरांनाही हादरे बसले.

दरम्यान, हा स्फोट झाला तेव्हा 30 हून अधिक कर्मचारी विविध युनिटमध्ये काम करत होते. स्फोटाचे आवाज आजूबाजूच्या गावांमध्येदेखील ऐकू आले. त्यामुळे अनेक जण घराबाहेर आले. याची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. या स्फोटात अनेक जणांचा मृत्यू झाला असून 15 हून अधिक कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे. काही कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना वाचवण्यासाठी मदत आणि बचावकार्य सुरू आहे.