
दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू दुबईमध्ये तीन दिवस अडकून पडल्यामुळे आलेल्या तणावातून अजून सावरलेली नसल्याने ती उद्यापासून सुरू होणाऱया स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होणार नाही. त्यामुळे या स्पर्धेत हिंदुस्थानची मदार प्रामुख्याने एच. एस. प्रणॉय आणि किदाम्बी श्रीकांत यांच्यावर असेल. अमेरिका आणि इस्राईल यांनी इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर निर्माण झालेल्या तणावामुळे आखाती भागातील हवाई क्षेत्रावर निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यामुळे सिंधू तीन दिवस दुबई येथे अडकली होती आणि तिला ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतूनही माघार घ्यावी लागली. दुबईतील अनुभवामुळे सिंधू मानसिकदृष्टय़ा तणावात होती. त्यामुळे तिला सावरण्यासाठी काही वेळ आवश्यक आहे. ती आता एप्रिलमध्ये होणाऱया आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमधून पुनरागमन करणार आहे.

























































