
देवदर्शनाहून परतत असताना मिनीबस दरीत कोसळून सात हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू झाला. अपघातात अनेक भाविक जखमी झाले आहेत. नेपाळच्या गोरखा जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य अद्याप सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनकामना मंदिरात दर्शन घेऊन हिंदुस्थानच्या भाविकांची बस तनहुन जिल्ह्यातील अनबुखैरेनी भागाकडे चालली होती. यादरम्यान शहिद लखन ग्रामीण नगरपालिकेच्या कांतार परिसरात मिनीबस रस्त्यावरून दरीत कोसळली. यात सात भाविक ठार झाले तर अनेक जण जखमी झाले. जखमींवर चितवन वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळी अद्याप बचावकार्य सुरू आहे, असे गोरखाचे मुख्य जिल्हा अधिकारी तुलसी बहादूर श्रेष्ठ यांनी आयएएनएसला सांगितले. अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.




























































