
जगभरात सर्वाधिक वापरला जाणारा वेब ब्राऊझर्स गूगल क्रोमबाबत गंभीर इशारा देण्यात आला आहे. गूगल क्रोम वेब ब्राउझरला सायबर हल्ल्याचा धोका आहे. यामुळे इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) या सरकारी संस्थेने झिरो-डे अलर्ट जारी केला आहे. ब्राउझरमध्ये तांत्रिक त्रुटी आढळल्या असून याचा वापर करून हॅकर्स युजर्सना लक्ष्य करू शकतात. याचा 350 कोटी युजर्सना फटका बसण्याची शक्यता असल्याने सर्व युजर्सना तात्काळ ब्राऊजर अपडेट करण्याच्या सल्ला देण्यात आला आहे.
फोर्ब्सच्या अहवालानुसार, क्रोममध्ये CVE-2026-3909 आणि CVE-2026-3910 या दोन गंभीर सुरक्षा त्रुटी आढळल्याचे गुगलने म्हटले आहे. या त्रुटी सायबर गुन्हेगारांना कोड कार्यान्वित करण्याची किंवा वापरकर्त्याच्या सिस्टमवरील डेटामध्ये प्रवेश करण्याची परवानगी देऊ शकतात. यामुळेच क्रोमचे जुने व्हर्जन वापरणाऱ्या युजर्सनी त्यांचे ब्राउझर त्वरित अपडेट करावे असा सल्ला एजन्सीने दिला आहे. या त्रुटी दूर करण्यासाठी गुगलने सुरक्षा पॅचेस जारी केले आहेत. नवीनतम अपडेट्स इन्स्टॉल केल्याने तुमच्या सिस्टमचे हॅकर्स आणि सायबर हल्ल्यांपासून संरक्षण होऊ शकते. युजर्सनी त्यांचे लॅपटॉप, संगणक, फोनचे अॅप्स आणि सॉफ्टवेअर अपडेटेड ठेवावे, असे सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी सांगितले. यामुळे युजर्सना नवीन फिचर्स मिळण्यासोबतच सायबर हल्ल्यांचा धोका देखील कमी होतो.

























































