
पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्धात सोमवारी भीषण वळण आले. पाकिस्तानने ‘ऑपरेशन गजब लिल हक” अंतर्गत अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला केला. या हल्ल्यात एका रुग्णालयालाही लक्ष्य करण्यात आले. यात 400 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 250 जण गंभीर जखमी झाले आहेत. पाकिस्तान सरकारने या हल्ल्याचे व्हिडीओ जारी करत ही कारवाई केवळ दहशतवादी तळांवर केल्याचा दावा केला आहे.
पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यानंतर ‘इस्लामिक एमिरेट्स ऑफ अफगानिस्तान’चे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी आक्रमकपवित्रा घेतला आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना मुजाहिद म्हणाले की, पाकिस्तानसोबत आता चर्चेची वेळ संपली आहे. या क्रूर हल्ल्याचा बदला अफगाणिस्तान नक्कीच घेईल. दरम्यान, डूरंड लाईनवर दोन्ही देशांच्या सेना आमनेसामने आल्या आहेत.
पाकिस्तानचे ‘नूर खान एअरबेस’ उडवल्याचा दावा
काबूलवरील हल्ल्याला काही तासच झाले असताना तालिबानने पाकिस्तानच्या महत्त्वाच्या लष्करी तळांवर हल्ले केल्याचा दावा केला आहे. तालिबानच्या माहितीनुसार, त्यांनी पाकिस्तानचे महत्त्वाचे ‘नूर खान एअरबेस’ लक्ष्य केले असून इस्लामाबाद, क्वेटा आणि रावळपिंडीतील पाक लष्कराच्या तळांना लक्ष्य केले आहे. पाकिस्तानने काबूल आणि नंगरहारमधील हल्ल्यांना ‘स्वसंरक्षणार्थ केलेली कारवाई’ असे संबोधले आहे. तालिबानच्या या दाव्यामुळे पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोन्ही देशांमधील लष्करी कारवाई तीव्र झाली आहे. काबूलवर हल्ला झाला तर पुढील लक्ष्य इस्लामाबाद असेल, असा इशारा अफगाण संरक्षणमंत्र्यांनी आधीच दिला होता.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव आता शिगेला पोहोचला असून डूरंड लाईनवर दोन्ही बाजूंकडून भीषण गोळीबार सुरू आहे. सीमेवर दोन्ही देशांनी आपले तोफखाने आणि रणगाडे तैनात केले आहेत. काबूलमधील रुग्णालयावरील हल्ल्याचे फुटेज समोर आल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये संतापाची लाट आहे. कोणत्याही क्षणी या संघर्षाचे रूपांतर मोठ्या युद्धात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


























































