
लग्न म्हणजेच आयुष्यातील अविस्मरणीय क्षण… लग्नात सुंदर दिसावं यासाठी नवरदेव किंवा नवरी मुलगी विविध युक्त्या लढवतात. कोणी डेस्टिनेशन वेडिंग करतं, तर कोणी किल्ला किंवा एखादी हवेली भाडय़ाने घेतं. कपडे, खाणं-पिणं, गिफ्ट, डेकोरेशन, फोटोग्राफी, व्हिडीओ शूटिंग असे नवनवीन ट्रेंड आजमावतात. मात्र बोहल्यावर चढलेल्या नवरदेवाने स्वतःच्या लग्नात चमकण्याच्या नादात गुडघ्याला बाशिंग बांधण्याऐवजी संपूर्ण अंगावर लायटिंगच लावल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. दिवाळीत घरांवर लावायची तोरणं त्याने अंगावर परिधान केली. @hemlatajk या ‘एक्स’ अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून या अतिउत्साही नवरदेवाला पाहून नेटकऱ्यांनी त्याच्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. ‘नवरदेव वीज विभागात काम करतो का?’ अशा विविध प्रतिक्रिया या पोस्टवर पडल्या आहेत.































































