जम्मूच्या सांबात भीषण स्फोट; माजी सरपंचाच्या घराचे गेट उडाले, परिसरात खळबळ!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात एका माजी सरपंचाच्या घराजवळ भीषण स्फोट झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, घराच्या मुख्य दरवाजाचे अक्षरशः तुकडे झाले आहेत. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सांबा जिल्ह्यातील सीमावर्ती भागात राहणाऱ्या एका माजी सरपंचाच्या घराला लक्ष्य करून हा स्फोट घडवण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. रात्रीच्या सुमारास झालेल्या या जोरदार आवाजामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. स्फोटानंतर घराच्या लोखंडी गेटचे मोठे नुकसान झाले असून भिंतींनाही तडे गेले आहेत.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि सुरक्षा दलांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संपूर्ण परिसराला वेढा घालण्यात आला असून फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला आयईडी (IED) होता की ग्रेनेड—याचा तपास सध्या सुरू आहे. या घटनेमागे दहशतवादी कट आहे की वैयक्तिक शत्रूत्व, या दिशेने पोलीस सध्या तपास करत आहेत. सीमावर्ती भागात अशा प्रकारचा स्फोट झाल्यामुळे सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.