ठाणे वनविभागाचा तपास फेल; माकडांचे शिकारी मोकाट, बक्षिसांची रक्कम 25 हजारांवरून 50 हजार केली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येऊरच्या जंगलात दोन माकडांची टोकदार बाणाने शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांचा शोध घेण्यात ठाणे वनविभाग सपशेल फेल ठरले आहे. तीन आठवडे उलटूनही या प्रकरणाचा छडा न लागल्याने प्राणीमित्रांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, वनविभागाने मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यांसाठी जाहीर केलेली २५ हजारांची रक्कम वाढवून ५० हजार केली आहे. त्यामुळे आता तरी शिकारी ‘जाळ्यात’ सापडतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

निसर्गाने नटलेल्या येऊर परिसरात बंदी असतानादेखील मोठमोठ्या आवाजात डीजे, फटाक्यांच्या आतषबाजीमुळे वन्यजीवांवर परिणाम होत असतानाच आता येथील वन्यजीवांवर हल्ले होऊ लागले आहेत. मागील महिन्यात टोकदार बाणाने माकडाच्या एका पिल्लाला मांडीत तर दुसऱ्याच्या मानेत बाण मारल्याची घटना समोर येताच खळबळ उडाली. याप्रकरणी वनविभागाने अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी माकडांची शिकार करणाऱ्यांचा शोध लागला नाही.

माकडांची प्रकृती स्थिर

एका माकडाच्या मांडीत, तर दुसऱ्या माकडाच्या थेट मानेत बाण मारण्यात आला. दोन्ही माकडे जखमी अवस्थेत असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. जखमी असलेल्या दोन्ही माकडांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती एका वनाधिकाऱ्यांनी दिली.

24 सीसीटीव्ही तपासले

माकडांची बाणाने शिकार करणाऱ्यांना पकडण्यासाठी वनविभागाने यासाठी तीन पथके तयार केली आहेत. प्रत्येक पथकात पाच अशी एकूण १५ जणांची टीम तयार केली आहे. दरम्यान, येऊर परिसरातील जवळपास २४ सीसीटीव्ही तपासण्यात आले असल्याची माहिती वनविभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिली.

या क्रमांकावर संपर्क करा

मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यास 50 हजारांचे रोख बक्षीस देण्यात येणार असून त्याची ओळख गोपनीय ठेवली जाणार आहे. ज्या कोणाला माहिती असल्यास त्यांनी ९८९२६८४२६६/९३७०११४३९९ या क्रमांकावर तत्काळ संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.