
गेल्या 40 दिवसांपासून आखातात सुरू असलेल्या युद्ध अखेर काही काळासाठी थांबले. बुधवारी इराण आणि अमेरिकेमध्ये 14 दिवसांचा युद्धविराम झाला. युद्धविराम झाल्यानंतरही अंतिम करार होईपर्यंत अमेरिकेचे सैन्य इंचभरही मागे हटणार नसल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले. याच दरम्यान त्यांनी ‘नाटो’ देशांवरही निशाणा साधत या संघटनेतून बाहेर पडण्याचे आणि ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याचे संकेतही दिले.
जगातील सर्वात मोठी लष्करी संघटना ‘नाटो’ आणि अमेरिका यांच्यातील संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. इराणविरुद्धच्या कारवाईत नाटो देशांनी साथ न दिल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून अमेरिकेने या संघटनेतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर नाटोचे प्रमुख मार्क रुटे आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली. ही भेट अत्यंत तणावपूर्ण राहिल्याचे समजते.
इराणसोबतच्या संघर्षात नाटो सदस्य देशांनी ज्या प्रकारे माघार घेतली, त्यावरून डोनाल्ड ट्रम्प अत्यंत निराश आहेत. याबाबत ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर एक पोस्टही शेअर केली. जेव्हा आम्हाला नाटोची गरज होती, तेव्हा ते नव्हते. भविष्यातही ते मदतीला येणार नाहीत, असे ट्रम्प यांनी म्हटले.
याआधी ट्रम्प यांनी नाटोची तुलना कागदी वाघाशी केली आहे. युरोपीय देश स्वतःच्या सुरक्षेसाठी अमेरिकेवर अवलंबून आहेत. पण जेव्हा अमेरिका आणि इस्रायलला गरज पडली, तेव्हा या देशांनी हात झटकले, असा आरोप ट्रम्प यांनी केला. या वादात त्यांनी जुन्या ग्रीनलँड वादाचा उल्लेख करत मित्र राष्ट्रांवर तिखट शब्दांत निशाणा साधला.

दरम्यान, इराणविरुद्धच्या मोहिमेत अनेक युरोपीय देशांनी अमेरिकेला सहकार्य करण्यास नकार दिला. अनेक देशांनी अमेरिकन लढाऊ विमानांना त्यांच्या हवाई क्षेत्रातून उड्डाण करण्यास परवानगी दिली नाही. समुद्रातील सुरक्षेसाठी आणि इराणच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी मित्र देशांनी आपली नौदलाची जहाजे पाठवण्यास नकार दिला. यामुळे ट्रम्प चांगलेच भडकले असून सध्या नाटो देशांमध्ये तणावाचे वातावरण असल्याचे मार्क रुटे यांनीही मान्य केले आहे.




























































