मेलोनींशी मतभेद असतील, पण देशाचा अपमान खपवून घेणार नाही, ट्रम्प यांच्या टीकेला ‘इटली’चे चोख प्रत्युत्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इटलीच्या संसदेत सध्या एका भाषणाची जोरदार चर्चा रंगली आहे. इटलीच्या विरोधी पक्षनेत्या एली श्लेन (Elly Schlein) यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सडकून टीका केली आहे. ट्रम्प यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यावर केलेल्या वैयक्तिक हल्ल्यानंतर, श्लेन यांनी आपल्या देशाच्या सन्मानासाठी मेलोनी यांची बाजू घेत ट्रम्प यांना खडे बोल सुनावले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी मेलोनी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे हा वाद उफाळून आला. ट्रम्प यांनी इटालियन वृत्तपत्र ‘कोरिरे डेला सेरा’ला दिलेल्या मुलाखतीत मेलोनी यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली होती. “मला वाटले होते की मेलोनी यांच्यात हिम्मत आहे, पण मी चुकीचा होतो,” असे ट्रम्प म्हणाले. नाटो (NATO) आणि इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाच्या मुद्द्यावरून इटली आपल्याला सहकार्य करत नसल्याचा आरोप करत, ट्रम्प यांनी मेलोनी यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती.

एकेकाळी ट्रम्प आणि मेलोनी हे युरोपमधील जवळचे मित्र मानले जात होते. ऑक्टोबर 2022 पासून मेलोनी यांनी अमेरिका आणि युरोपमधील दुवा म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, आता या मैत्रीत मोठी दरी निर्माण झाली आहे. ट्रम्प यांच्या मते, इराणकडे अण्वस्त्रे असली तरी मेलोनी यांना त्याचा फरक पडत नाही, जे इटलीसाठी धोकादायक ठरू शकते. या विधानामुळे इटलीच्या सार्वभौमत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याची भावना तेथील नेत्यांमध्ये निर्माण झाली आहे.

ट्रम्प यांच्या या विधानानंतर इटलीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक सर्व हेवेदावे विसरून एकत्र आले आहेत. एली श्लेन यांनी संसदेत बोलताना ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला. इटली हा एक स्वतंत्र आणि सार्वभौम देश आहे. कोणत्याही परदेशी राष्ट्राध्यक्षाला आमच्या सरकारचा अपमान करण्याचा किंवा आम्हाला धमकावण्याचा अधिकार नाही. जरी संसदेत आम्ही एकमेकांचे विरोधी असलो, तरी इटलीवर होणारा कोणताही हल्ला आम्ही खपवून घेणार नाही, असे श्लेन यावेळी म्हणाल्या.

एली श्लेन यांच्या या भूमिकेचे इटलीच्या संसदेत उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले. देशाच्या अस्मितेसाठी विरोधी पक्षाने सरकारची साथ दिल्यामुळे या घटनेची आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्येही मोठी चर्चा होत आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून देशाला प्रथम स्थान देण्याच्या श्लेन यांच्या या कृतीमुळे मेलोनी सरकारला मोठे नैतिक बळ मिळाले असून, ट्रम्प यांच्या विरोधात इटली आता एकवटला आहे.

मला वाटले त्या धाडसी आहेत… ट्रम्प यांची जॉर्जिया मेलोनी यांच्यावर कडक शब्दांत टीका