
चंदननगर परिसरातील वकिलाच्या कार्यालयात काम करणाऱ्या ३२ वर्षीय सेक्रेटरी महिलेच्या निघृण हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अॅड. संजय सावंत हा भारतीय जनता पक्षाच्या कायदा आघाडीचा प्रदेश उपाध्यक्ष आहे. त्यामुळे या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. सावंत आणि त्याची पत्नी स्वाती सावंत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, प्रेमसंबंधाच्या संशयातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती तपासातून पुढे आली आहे.
पूनम दिनेश मून (वय ३२, रा. गणेशनगर, येरवडा) असे मृत महिलेचे नाव आहे. चंदननगरमधील जुन्या पाण्याच्या टाकी रस्त्यावरील अॅड. सावंत यांच्या कार्यालयात हा प्रकार घडला. आरोपींनी पूनम हिचे हात-पाय बांधून क्रिकेट बॅटने डोक्यावर व तोंडावर वार करत हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर मृतदेह पोत्यात भरून कार्यालयातच टाकून दिला होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार स्वाती सावंत यांना पूनम आणि संजय सावंत यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. या संशयातून घरगुती वाद वाढले आणि त्यातूनच हा कट रचण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
अॅड. संजय सावंत हा भाजपच्या कायदा आघाडीत प्रदेशस्तरावर पदाधिकारी असल्याने या प्रकरणाची राजकीय पातळीवरही चर्चा सुरू झाली आहे. पूनम अॅड. सावंत भाजपचा पदाधिकारी गेल्या साडेतीन वर्षांपासून सावंत याच्या कार्यालयात सहायक म्हणून काम करत होती. गुरुवारी ती नेहमीप्रमाणे कार्यालयात गेली होती-मात्र, रात्रीपर्यंत घरी न परतल्याने तिच्या पतीने शोध घेतला. शुक्रवारी सकाळी कार्यालयात गेल्यावर ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चंदननगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सावंत दाम्पत्याला अटक केली आहे. तसेच त्यांच्या १३ वर्षीय मुलीलादेखील ताब्यात घेतले असून, या सर्वांची चौकशी सुरू आहे.

























































