
इराण-अमेरिकेमध्ये युद्धविराम सुरू असताना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या हिंदुस्थानी जहाजांवर इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) गोळीबार केला होता. त्यानंतर हिंदुस्थान सतर्क झाला असून पर्शियन आखातातील हिंदुस्थानी जहाजांसाठी एक नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. जहाजांना लारक बेटापासून दूर राहण्यास आणि सुरक्षेच्या कारणास्तव नौदलाच्या निर्देशांनुसार मार्गक्रमण करण्यास सांगण्यात आले आहे. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
लारक बेट हे होर्मुझ सामुद्रधुनीच्या सर्वात अरुंद भागात असून ते इराणच्या तेल पायाभूत सुविधांचे मुख्य केंद्र आहे. या बेटाच्या आसपासच्या भागात इराणचे लष्करी तळ आणि वेगवान बोटींचा मोठा ताफा तैनात असतो. हिंदुस्थानने आता हिंदुस्थानी जहाजांना या बेटाच्या जवळून न जाण्याचा सल्ला दिला आहे. सध्या ओमानच्या किनारपट्टीजवळील जुना मार्ग सुरुंग पेरल्याच्या भीतीने टाळला जात असून केवळ नौदलाच्या परवानगीनंतरच जहाजांना पुढील प्रवासाची मुभा दिली जात आहे.
‘जग अर्णव’ (Jag Arnav) आणि ‘सन्मार हेराल्ड’ (Sanmar Herald) ही दोन हिंदुस्थानी जहाजे होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना आयआरजीसीने त्यांच्यावर गोळीबार केला. त्यामुळे ही जहाजे तत्काळ माघारी फिरली, तर ‘देश गरिमा’ हा टँकर तिथून निसटला. सध्या हिंदुस्थानी नौदल या जहाजाला अरबी समुद्रात संरक्षण देत आहे. हे जहाज 22 एप्रिल रोजी मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.
होर्मुझमध्ये इराणचा हिंदुस्थानी जहाजांवर गोळीबार; एक निसटले, 13 जहाजांची माघार
दरम्यान, पर्शियन आखातात सध्या हिंदुस्थानची १४ जहाजे अडकली असून ती सुरक्षित प्रवासाच्या प्रतीक्षेत आहेत. हिंदुस्थानी नौदल या जहाजांच्या सतत संपर्कात आहे. हिंदुस्थानी नौदलाने पर्शियन आखाताच्या परिसरात 7 युद्धनौका तैनात केल्या आहेत. सामुद्रधुनी ओलांडल्यानंतर हिंदुस्थानी जहाजांना या युद्धनौकांमार्फत अरबी समुद्रात सुरक्षित संरक्षण दिले जात आहे. तणावपूर्ण स्थिती असूनही आतापर्यंत 11 हिंदुस्थानी जहाजांनी ही सामुद्रधुनी यशस्वीपणे ओलांडली आहे.
























































