
भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी ‘विश्वगुरु’ या शब्दाच्या वापरावर भाष्य करताना म्हटले आहे की, ‘आपण सध्या हा शब्द वापरू नये, कारण सध्या आपण ‘विश्वगुरु’ नाही आहोत. आपण विश्वगुरु व्हायला हवे आणि पूर्वी आपण तसे होतोही, परंतु आज आपण आहोत असे म्हणणे योग्य नाही’. मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्य ज्येष्ठ नेत्यांनी हे विधान करणे म्हणजे भाजपला जबरदस्त चपराक आहे.
संस्कृतसाठी कार्य करणाऱ्या ‘संस्कृत भारती’ या संस्थेचे दिल्लीत कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या उद्घाटन प्रसंगी माध्यमांनी मुरली मनोहर जोशी यांनी प्रश्न विचारले. त्यावर ते उत्तर देत होते. संस्कृत भाषेचे महत्त्व अधोरेखित करताना एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी जोशी म्हणाले की, संस्कृत भाषेसाठी कार्य करणाऱ्या संस्थेचे उद्घाटन होत आहे ही आनंदाची बाब आहे, परंतु खरं यश तेव्हाच मानली जाईल जेव्हा देशातील बहुतांश कामे संस्कृत भाषेत होतील. संस्कृत हीच हिंदुस्थानची खरी राष्ट्रभाषा असावी अशी अनेकांची इच्छा होती आणि जरी ते शक्य झाले नसले तरी या भाषेत कामकाज होणे आवश्यक आहे. नासाचे संशोधक देखील संस्कृत ही संवादासाठीची सर्वात महत्त्वाची भाषा असल्याचे वारंवार सांगतात आणि ही भाषा केवळ हिंदुस्थानचीच नव्हे, तर संपूर्ण जगाची वारसा असून ती ज्ञान, विज्ञान, अध्यात्म आणि तंत्रज्ञानाची भाषा आहे’, असेही त्यांनी नमूद केले.
Delhi: Veteran BJP Leader Murli Manohar Joshi says, ”We should be a ‘Vishwaguru’, and we have been one in the past. If we are not one today, that is not the case, but Sanskrit is very important from that perspective. Even people at NASA repeatedly say that Sanskrit is one of the… pic.twitter.com/ttgtifDEoi
— IANS (@ians_india) April 20, 2026
याच कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘संस्कृत हा हिंदुस्थानचा प्राण आहे’ असे प्रतिपादन केले. संस्कृत भारतीच्या केंद्रीय कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना भागवत म्हणाले की, संस्कृत ही केवळ एक भाषा नसून ती हिंदुस्थानचा आत्मा आहे, कारण विचार, जीवन आणि संस्कृतीची सर्वात प्राचीन आणि आजही जिवंत असलेली परंपरा हिंदुस्थानातच आहे. हिंदुस्थान हे केवळ एक भौगोलिक नाव किंवा राजकीय आणि आर्थिक घटक नसून ती एक अखंड परंपरा आहे, ज्याच्या आधारावर जीवनप्रवाह सुरू आहे. संस्कृत भाषा या परंपरेचा पाया असून ती हिंदुस्थानचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
























































