धक्कादायक… अजित पवार गटाने गावातील पूल भंगारवाल्याला विकला; शिंदे गटाची ‘नाकाबंदी’, ग्रामस्थांची पोलीस ठाण्यात धाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सत्तेसाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या अजित पवार गट व शिंदे गटाचा रायगडात मात्र सवतासुबा असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. माणगावच्या गंगेवाडी गावात शिंदे गटाची ‘नाकाबंदी’ करण्यासाठी येथील जुना पूल चक्क अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी २४ हजारांत भंगारवाल्याला विकला आहे. या राजकीय चिखलामुळे पावसाळ्यात शेतावर जाणारा मार्गच बंद झाल्यामुळे गावकरी संतप्त झाले असून याविरोधात माणगाव पोलीस ठाण्यात धाव घेत चौकशीची मागणी केली आहे. अजित पवार गट आणि शिंदे गटातील वादावादीमुळे गाव तसे चांगले, पण वेशीला टांगले अशी अवस्था गंगेवाडीची झाली आहे.

इंदापूर विभागात जवळपास दीडशे घरांचे गंगेवाडी हे टुमदार गाव आहे. गावाच्याच बाजूला एक नदी असून शेतावर ये-जा करण्यासाठी एक लोखंडी पूल उभारण्यात आला होता. मात्र गावातील अजित पवार गटाच्या पदाधिकारी व काही कार्यकर्त्यांनी हा पूलच इंदापूरमधील अदिल खान या भंगारवाल्याला विकला आहे. ठरल्याप्रमाणे अदिल खान व त्याच्या साथीदारांनी गॅस कटरच्या सहाय्याने हा पूल एका दिवसात तोडून त्याचे लोखंड आपल्या गोदामात नेले. या भयंकर घटनेची माहिती समजताच गावकऱ्यांना धक्काच बसला. शिंदे गट तसेच १५ ते ३० गावकऱ्यांनी याबाबत पोटनेर ग्रामपंचायतीचे प्रशासक व ग्रामसेवक राकेश मोरे यांची भेट घेत जाब विचारला.

उद्याच्या बैठकीत काय होणार?

ग्रामसेवक राकेश मोरे यांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज आल्याचे मान्य करत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हा अर्ज पोलिसांना दिल्याचे सांगितले. तसेच या मुद्यावर उद्या सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थ व पोलिसांची बैठक होणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे या बैठकीत नेमके काय होते, याकडे पोटनेर ग्रामपंचायत हद्दीतील गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

प्रकरण अंगलट येताच देवाचा ‘धावा’

शिंदे गटाने या मुद्यावरून अजित पवार गटाला घेरण्याची जोरदार तयारी केली आहे. ग्रामस्थांनीदेखील पुलाच्या केलेल्या सौद्यावरून संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे नाचक्की झालेल्या अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आता देवाचा ‘धावा’ केला आहे. पुलाच्या विक्रीतून गावातील मंदिराच्या खिडक्या बसवण्यात येणार आहेत, अशी अजब सारवासारव केली जात आहे. मात्र या दोन गटांतील वादामुळे गावाचा विकास खुंटत असल्याचा आरोप गंगेवाडीवासीयांनी केला आहे.