
>> प्रसाद ताम्हनकर, [email protected]
विज्ञान कथांमध्ये किंवा हॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये आपण अनेकदा चंद्रावर माणसांची शहरं वसलेली पाहतो. आजपर्यंत ही केवळ कल्पनाशक्ती वाटत होती, पण आता जागतिक अंतराळ विज्ञान या कल्पनेला वास्तवात उतरवण्यासाठी सज्ज झाले आहे. अमेरिकेची जगप्रसिद्ध अंतराळ संस्था ‘नासा’ सध्या एका अशा ऐतिहासिक मोहिमेवर काम करत आहे, ज्याअंतर्गत चंद्राच्या पाठीवर माणसाला कायमस्वरूपी राहता येईल असा एक मून बेस म्हणजेच मानवी वस्ती स्थापन केली जाणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाला आर्टेमिस प्रोग्राम असे नाव देण्यात आले असून यात केवळ नासाच नाही, तर जगातील अनेक प्रगत देश आणि खासगी कंपन्याही आपली ताकद पणाला लावत आहेत.
मानवाच्या अंतराळ इतिहासाचा विचार केला तर 1972 मध्ये अपोलो 17 या मोहिमेद्वारे माणसाने शेवटचा चंद्रावर पाय ठेवला होता. त्यानंतर तब्बल पाच दशकांहून अधिक काळ एकही माणूस पुन्हा चंद्रावर गेला नाही. या दीर्घ काळानंतर आता माणूस पुन्हा चंद्राकडे झेप घेत आहे, पण यावेळचा उद्देश पूर्वीसारखा केवळ तिथे फिरून परत येणे एवढाच नाही. यावेळची लढाई चंद्रावर हक्काचे घर तयार करण्यासाठी आहे. नासाचा प्लॅन असा आहे की, चंद्राच्या जमिनीवर एक आधुनिक आणि सुरक्षित घर तयार करायचे, ज्याला आर्टेमिस बेस कँप म्हटले जाईल. या घरात एका वेळी चार अंतराळवीर काही आठवडे मुक्काम ठोकू शकतील. या घरासोबतच अंतराळवीरांना फिरण्यासाठी एक खास उघडी गाडी म्हणजेच लुनार टेरेन व्हेइकल आणि एक चालती फिरती प्रयोगशाळाही दिली जाईल. याशिवाय चंद्राच्या कक्षेत फिरणारे लुनार गेटवे (Lunar Gateway) नावाचे एक छोटे स्पेस स्टेशनही तयार केले जाईल, जे पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील मुख्य नियंत्रण केंद्र म्हणून काम करेल.
या संपूर्ण मोहिमेसाठी नासाने चंद्राचा दक्षिण ध्रुव हा भाग निवडला आहे. या निवडीमागे एक अत्यंत मोठे वैज्ञानिक कारण म्हणजे, तिथे अब्जावधी वर्षांपासून सूर्यप्रकाश न पोहोचलेल्या खड्डय़ांमध्ये मोठ्या प्रमाणावर बर्फाच्या स्वरूपात पाणी असण्याची दाट शक्यता आहे. जर तिथे पाण्याचा साठा मिळाला, तर मानवाचा अंतराळ प्रवासाचा खर्च कमालीचा कमी होणार आहे. कारण याच बर्फाचा वापर करून पिण्याचे पाणी मिळवता येईल आणि विज्ञानाच्या मदतीने त्यातून मानवाला जगण्यासाठी लागणारा ऑक्सिजन आणि रॉकेटसाठी लागणारे हायड्रोजन इंधन चंद्रावरच तयार करता येईल.
परंतु हा प्रकल्प जितका रोमांचक वाटतो, तितकाच तो निसर्गाच्या दृष्टीने अत्यंत भयानक आणि आव्हानात्मक आहे. चंद्रावर दिवसा तापमान चक्क 121 अंश सेल्सिअसच्या वर जाते, तर रात्री ते उणे 130 अंश सेल्सिअसच्या खाली घसरते. अशा अतिविषम हवामानात मानवी शरीराला जिवंत ठेवणे आणि उपकरणांचे रक्षण करणे हे मोठे आव्हान आहे. वातावरणाच्या अभावामुळे सूर्यापासून निघणारे प्राणघातक रेडिएशन थेट चंद्राच्या जमिनीवर आदळते, ज्यामुळे अंतराळवीरांना गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. या तांत्रिक आव्हानांशिवाय या मून बेसच्या मागे एक अदृश्य राजकीय आणि आर्थिक सत्तेचा खेळही सुरू झाला आहे. जो देश किंवा कंपनी आधी पोहोचेल, तिचे तिथल्या मौल्यवान खनिजांवर नियंत्रण राहील, ज्यामुळे भविष्यात एक नवे स्पेस वॉर सुरू होण्याची भीतीही तज्ञ व्यक्त करत आहेत.
शेवटी नासाच्या या मून बेसचे अंतिम उद्दिष्ट केवळ चंद्रावर थांबणे हे नाही, तर ती मानवाच्या मंगळ ग्रह मोहिमेची पहिली पायरी आहे. पृथ्वीवरून थेट मंगळ ग्रहावर जाण्यापेक्षा चंद्रावर राहण्याचा सराव करून तिथूनच रॉकेटमध्ये इंधन भरून मंगळाकडे झेप घेणे खूप सोपे आणि स्वस्त पडते. येत्या काही वर्षांत जेव्हा आपण रात्री आकाशात चंद्राकडे पाहू, तेव्हा तिथे माणसाने लावलेले दिवे आणि त्याची घरे आपल्याला पाहायला मिळतील. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा हा चमत्कार मानवजातीचा इतिहास कायमचा बदलून टाकणारा ठरणार आहे, यात शंका नाही.




























































