कचरा गाड्या वाटेत उभ्या; वाहतुकीस अडथळे, सुमित एल्कोप्लास्टविरोधात शिवसेना आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सुमित एल्कोप्लास्ट कंपनीच्या कर्मचाऱ्यांची मनमानी नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. कचऱ्याच्या गाड्या रस्त्याच्या मधोमध उभ्या करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला जात आहे. यामुळे अपघात वाढले आहेत. कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या गैरवर्तनाबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला आहे. कंपनीच्या बेशिस्त कारभाराची तक्रार पालिका आयुक्तांसह प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे केली आहे.

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी सुमित एल्कोप्लास्ट कंपनीकडे आहे. मात्र ठेका मिळाल्यापासून कंपनी वादात आहे. कंपनीच्या गैरकारभाराबाबत यापूर्वीही सप्टेंबर २०२५ मध्ये तक्रार अर्ज देण्यात आला होता. मात्र त्यानंतरही वाहनचालक आणि कर्मचाऱ्यांच्या वर्तनात कोणताही बदल झालेला नसल्याचा आरोप शिवसेना शाखाप्रमुख हेमंत गिमावकर आणि युवा शाखा अधिकारी अनुज मोरे यांनी केला आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून जनसामान्यांशी गैरवर्तन होणे अयोग्य असून बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

दंडात्मक कारवाई करा !

कचरा संकलन करताना कल्याण-डोंबिवलीतील रहदारीच्या रस्त्यांवर मधोमध गाड्या उभ्या केल्या जात असल्याने वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या बेजबाबदार वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल, प्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच सुमित एल्कोप्लास्ट कंपनीच्या व्यवस्थापकांकडे केली आहे.