
मुंबईची वाढती तहान भागवण्यासाठी पालिका गारगाई हे नवे धरण बांधत आहे. येत्या ऑक्टोबरपासून या धरणाचे काम सुरू होणार आहे. या धरणातून दररोज 440 दशलक्ष लिटर पाणीसाठा मिळणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. या धरणामुळे मुंबईचा पाणी प्रश्न मिटणार आहे.
मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून दररोज 4100 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र गेल्या काही वर्षांत मुंबईचे नागरीकरण वाढल्याने पाण्याची मागणीही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून गारगाई हे नवीन धरण बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. गारगाई धरण प्रकल्पासाठी 657 हेक्टर जमीन संपादन करण्यात आली आहे. प्रकल्पासाठी लागणाऱ्या केद्र आणि राज्य सरकारच्या दोन महत्त्वाच्या परवानग्या जुलैपर्यंत मिळतील, अशी माहितीही पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
धरणक्षेत्रातच तीन लाख झाडे लावणार
गारगाई धरण प्रकल्पात चार गावे बाधित होणार असून त्या गावांचे वाडा तालुक्यातील देवळी गावात 400 हेक्टर जमिनीवर पुनर्वसन करण्यात येणार आहे, तर तीन लाख झाडे धरणाजवळ पाच किलोमीटर अंतरावर पुनर्रोपित करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या प्रकल्पांतर्गत चंद्रपूर, हिंगोली, वाशीम जिल्ह्यात 658 हेक्टर जमिनीवर नवीन झाडे लावली जाणार आहेत.
पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती
सध्याची पाण्याची मागणी 4665 दशलक्ष लिटर
2041 पर्यंत अपेक्षित मागणी 6424 दशलक्ष लिटर
सध्याचा दररोजचा पाणीपुरवठा 4100 दशलक्ष लिटर



























































