‘आपले सरकार’ कोसळले, पोर्टल बंद असल्याने विद्यार्थी त्रस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र ऑनलाईन मिळवून देणारे आपले सरकार पोर्टल सतत बंद राहत असल्याने राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची कागदपत्रे ऐन अॅडमिशन हंगामात रखडली आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालक हैराण झाले आहेत. सर्व्हर डाऊन होत असल्याने ही समस्या उद्भवली असल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत आहे.

‘आपले सरकार’ पोर्टलवरून रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेयर, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र तसेच जन्म-मृत्यू प्रमाणपत्राशी संबंधित अनेक प्रमाणपत्रे ऑनलाईन काढता येतात.

शिष्यवृत्ती अर्ज, नोकरी भरती प्रक्रिया तसेच शासनाच्या विविध योजनांसाठी ही कागदपत्रे अत्यंत आवश्यक असताना पोर्टल बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व व्यावसायिक नुकसान होत आहे. अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश, शिष्यवृत्ती व इतर महत्त्वाच्या प्रक्रियांपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या अकरावी प्रवेश सुरू असल्याने
महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांकडे अनेक प्रकारच्या प्रमाणपत्रांची मागणी केली जाते. मात्र पोर्टलच बंद असल्याने ते त्रस्त झाले आहेत. सरकारने तांत्रित दोष दूर करून तातडीने पूर्ववत करावे, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल, असा इशारा प्रहार विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अॅड. मनोज टेकाडे यांनी दिला आहे.