नवी मुंबईत शिंदे गटाचा नगरसेवक साहिल चौगुलेवर बलात्काराचा गुन्हा, शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर अत्याचार; फोटो व्हायरल करण्याची धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवी मुंबई महापालिकेतील शिंदे गटाचा स्वीकृत नगरसेवक साहिल चौगुले याच्यावर रबाळे पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा बुधवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आला. साहिल याने एका २६ वर्षीय विवाहित महिलेला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडित महिलेचे नग्न फोटो आणि व्हिडीओ काढले. हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत गेल्या दोन वर्षांपासून साहिल आपल्यावर अत्याचार करत असल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.

घणसोली येथील तळवली गाव परिसरात राहणारी एक २६ वर्षीय विवाहित तरुणी २०२४ मध्ये साहिल चौगुले यांच्या ऐरोली येथील घरी आपल्या आत्याला भेटण्यासाठी गेली होती. या तरुणीची आत्या चौगुले यांच्या घरी काम करत होती. ही तरुणी घरी आल्यानंतर साहिल याने तिला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत या तरुणीवर अत्याचार केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तरुणीने साहिलला जाब विचारला असता त्याने तिला तिचे नग्न फोटो आणि व्हिडीओ दाखवले. नंतर तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर गेल्या दोन वर्षांपासून अनेकवेळा अत्याचार केला. फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन साहिल याने नुकतेच या तरुणीला वाशी येथील एका हॉटेलमध्ये बोलावून घेतले आणि तिथेही तिच्यावर बलात्कार केला. तिने केलेल्या तक्रारीनुसार रबाळे पोलिसांनी साहिल चौगुले याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.