हजारो शिवभक्तांचा मार्ग होणार सुकर, मुंबई-गोवा महामार्गावर आजपासून दोन दिवस जड वाहतुकीला नो एन्ट्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या हजारो शिवभक्तांची वाहतूककोंडीतून सुटका होणार आहे. जिल्हा प्रशासनाने उद्या ५ ते ६ जून असे दोन दिवस मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीला नो एन्ट्री केली आहे. बंदी काळात जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला मात्र यातून सूट देण्यात आली आहे.

रायगड किल्ल्यावर ६ जून रोजी पार पडणाऱ्या ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे. या सोहळ्यात मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित राहणार असल्याने कोणतीही वाहतूककोंडी किंवा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून रायगड जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे यांनी रायगड जिल्ह्यात ५ जून रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून ते ६ जून रोजी रात्री १० वाजेपर्यंत काही प्रमुख मार्गांवर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे.

या मार्गांवर अवजड वाहतूक बंदी

वाकणफाटा, नागोठणे ते कशेडी.

माणगाव-निजामपूर मार्ग पाचाड ते रायगड किल्ला.

ढालघरफाटा मार्गे पाचाड ते रायगड किल्ला.

महाड-नातेखिंड मार्ग: या मार्गे पाचाड ते रायगड किल्ला.

जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला सूट

जड-अवजड वाहनांमुळे अपघात, वाहतूककोंडी होण्याची शक्यता असते. त्यामुळे अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. मात्र या काळात दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने, अत्यावश्यक, फायर ब्रिगेड वाहने, रुग्णवाहिकांना यातून सूट असणार आहे.