
पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी महापालिकेने ठाण्यातील धोकादायक इमारतींवर कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील १३ अतिधोकादायक व धोकादायक इमारतींपैकी ५१ इमारती तातडीने रिकाम्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या इमारतींमध्ये राहणाऱ्या २१७ कुटुंबांवर ऐन पावसाळ्याच्या तोंडावर बेघर होण्याची वेळ आली आहे. दरम्यान अजूनही ४२ इमारती धोकादायक स्थितीत असून त्यांच्यावरील लवकरच कारवाईची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरातील अतिधोकादायक, धोकादायक इमारतींची यादी पालिका प्रशासनाने काही दिवसांपूर्वी जाहीर केली होती. ठाणे पालिका हद्दीत तब्बल ४ हजार ४३७ इमारती धोकादायक असून सर्व इमारतींना प्रशासनाने नोटिसाही दिल्या होत्या. पावसाळा सुरू होण्यापूर्वी इतर ठिकाणी राहण्याचा बंदोबस्त करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले होते. दरम्यान एखादी दुर्घटना घडून वित्तहानी, जीवितहानी झाल्यास पालिका जबाबदार राहणार नाही, असा इशारा पालिकेने दिला होता. मात्र त्यानंतरही इमारती सोडण्यास नकार देणाऱ्या रहिवाशांवर पालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
नौपाडा-कोपरीत जास्त इमारती
नऊ प्रभाग समिती हद्दीत अतिधोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये नौपाडा-कोपरी हद्दीतील २७ इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. तर कळवा आणि दिव्यातील प्रत्येकी एक इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे.
प्रशासनाविरोधात रोष
अनेक इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा घोळ सुरू आहे. तसेच इमारती रिकाम्या करण्यास नागरिक तयार नसल्याचे समोर आले आहे. या इमारती रिकाम्या करताना महापालिका प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
























































