
मुंबईत हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये आगीच्या घटना घडू नयेत यासाठी पालिकेचे अग्निशमन दल सतर्क असून जानेवारीपासून आतापर्यंत 428 ठिकाणी हॉटेल, रेस्टॉरंट, बार, पार्टी हॉल्सची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये अग्निशमन यंत्रणा ठप्प असल्याप्रकरणी 17 जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसनुसार आता अग्निसुरक्षेच्या उपाययोजना करण्यास 120 दिवसांचा कालावधी मिळणार नसून तातडीने अग्निशमन यंत्रणा सुरू करावी लागणार आहे. अन्यथा हॉटेल, रेस्टॉरंटची वीज, पाणी कापणार असल्याचा इशारा अग्निशमन दलाकडून देण्यात आला आहे.
दिल्लीमध्ये मालवीय रेस्टॉरंटमध्ये लागलेल्या आगीत 23 जणांचा होरपळून मृत्यू झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात मुंबईत असलेल्या रेस्टॉरंट-हॉटेलच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील स्थितीचा आढावा घेतला असता अग्निशमन दलाकडून नियमित तपासणीसोबतच वर्षअखेरीस व्यापक स्वरूपात अग्निसुरक्षा यंत्रणा आहे की नाही याची तपासणी सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. अग्निशमन यंत्रणा नसल्यास तातडीने अग्निशमन यंत्रणा बसवण्याच्या सूचना देण्यात येतात. याआधी अग्निशमन यंत्रणा बसवण्यासाठी 120 दिवसांची मुदत देण्यात येत होती. मात्र आता महाराष्ट्र फायर सर्व्हिस अॅक्टनुसार अग्निशमन दलाच्या अधिकानुसार दोन आठवडे ते एक महिन्याची मुदत अग्निशमन यंत्रणा बसवण्यासाठी देण्यात येत असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. या कालावधीत अग्निशमन यंत्रणा उभारली नाही तर वीज-पाणी कापण्याची कारवाई होऊ शकते.
अशी झाली कारवाई
2025 मध्ये एकूण 2721 हॉटेल, बार आदींची तपासणी करण्यात आली. यामध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्याने 22 जणांना नोटीस बजावली.
जानेवारी 2026पासून आतापर्यंत 428 रेस्टॉरंट, हॉटेल्सची तपासणी करण्यात आली. यामध्ये 17 ठिकाणी अग्निशमन यंत्रणा नसल्याने त्यांना नोटीस बजावली.
बेकायदा सिलिंडरही जप्त
मुंबईत सिलिंडर स्फोट होऊन आग लागल्याच्या घटनाही घडत असल्याचे समोर आल्यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंटमधील बेकायदेशीर सिलिंडर्स अग्निशमन दलाकडून जप्त करण्यात येतात. यामध्ये गतवर्षी 190 तर यावर्षी आतापर्यंत 58 सिंिलंडर जप्त करण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.























































