
IPL २०२६ मध्ये ७३२ धावांचा पाऊस पाडणाऱ्या शुभमन गिलला आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी हिंदुस्थानी टी-२० संघात स्थान मिळालेले नाही. आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारणाऱ्या गुजरात टायटन्सचा (GT) हा कर्णधार संघात पुनरागमन करेल अशी दाट शक्यता होती, पण निवडकर्त्यांनी वेगळा विचार केला. ‘PTI’च्या रिपोर्टनुसार, BCCI ने गिलसाठी एक दीर्घकालीन रणनीती आखली आहे. त्याला सध्या टी-२० क्रिकेटपासून दूर ठेवून, पूर्ण लक्ष कसोटी आणि वनडे क्रिकेटवर केंद्रित करण्यास सांगण्यात आले आहे.
शुभमन गिल सध्या टीम इंडियाच्या कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार आहे. टीम इंडियाला आगामी काळात जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) अंतर्गत ९ महत्त्वाच्या कसोटी आणि २०२७ च्या वनडे विश्वचषकापूर्वी सुमारे ३५ वनडे सामने खेळायचे आहेत. इतक्या व्यस्त वेळापत्रकात गिलवर शारीरिक आणि मानसिक थकवा येऊ नये, अशी व्यवस्थापनाची इच्छा असल्याची माहिती समोर आली आहे. डब्लूटीसी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताला ९ पैकी किमान ७ सामने जिंकणे आवश्यक असल्याने, गिलवर फलंदाजासोबतच कर्णधार म्हणूनही मोठी जबाबदारी असेल. आज तकने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
ना एक धाव कमी, ना जास्त! केएल राहुलचा ‘परफेक्ट 100’वर गेम ओव्हर, अजब विक्रमाची नोंद
बीसीसीआय सध्या गिलच्या ‘वर्कलोड मॅनेजमेंट’वर काम करत आहे, जेणेकरून तो आयसीसी ट्रॉफी जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकेल. २०२५ मधील आंतरराष्ट्रीय टी-२० मधील त्याचा सुमार फॉर्म (१५ सामन्यांत २९१ धावा) त्याला डच्चू मिळण्यास कारणीभूत ठरला असला, तरी त्याचे टी-२० चे दरवाजे कायमचे बंद झालेले नाहीत. २०२८ चा टी-२० विश्वचषक आणि लॉस एंजेलिस ऑलिम्पिक अजून दूर असल्याने, सध्या २०२७ च्या वनडे विश्वचषकापर्यंत त्याच्या फिटनेसला प्राधान्य दिले जात आहे.

























































