Share Market News – 5 दिवसात 60,000 कोटींचे नुकसान; टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचे शेअर गडगडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या आठवड्यात शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समधील टॉप १० कंपन्यांपैकी सहा कंपन्यांच्या बाजारमूल्यात मोठी घसरण झाली असून, देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज (रिलायन्स) मधील गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान सोसावे लागले आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना केवळ पाच दिवसांत ४०,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले, तर टाटा ग्रुपच्या टीसीएसमुळेही गुंतवणूकदारांना मोठे नुकसान झाले. पाच दिवसात टीसीएसला २०,००० कोटींहून अधिक नुकसान झाले. गिफ्ट निफ्टीमध्ये 356 अंकांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोमवारी शेअर बाजारात आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गेल्या आठवड्यात शेअर बाजारातील घसरणीच्या काळात, बीएसईचा ३०-शेअर सेन्सेक्स निर्देशांक ५३२ अंकांनी घसरला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी निर्देशांक १८१ अंकांनी खाली आला. सेन्सेक्समधील टॉप १० कंपन्यांपैकी सात कंपन्यांच्या बाजार भांडवलात एकत्रितपणे १.२५ लाख कोटी रुपयांची घट झाली. रिलायन्स आणि टीसीएससह सात कंपन्यांना नुकसान झाले असले तरी, घसरत्या बाजारातही तीन कंपन्यांनी गुंतवणूकदारांना दिलासा दिला.

गेल्या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य १७.४७ लाख कोटी रुपयांपर्यंत घसरले आणि गुंतवणूकदारांना अवघ्या पाच दिवसांत ३९,७१८ कोटी रुपयांचे नुकसान झाले. देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टाटा ग्रुपच्या टीसीएसला सर्वाधिक फटका बसला, तिचे बाजारमूल्य २०,१३५ कोटी रुपयांनी घसरून ७.९५ लाख कोटी रुपयांवर आले. केवळ या दोन कंपन्यांना पाच दिवसांत अंदाजे ६०,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले.

गुंतवणूकदारांना फायदा पोहोचवणाऱ्या तीन कंपन्यांमध्ये देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक एसबीआय यादीत अव्वल स्थानी आहे. तिचे बाजार भांडवल १२,६९२ कोटींनी वाढून ९.०२ लाख कोटी झाले. याव्यतिरिक्त, आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल ४,४८५ कोटी रुपयांनी वाढून ९.०५ लाख कोटी रुपये झाले. तर एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल ४,१०१ कोटी रुपयांनी वाढून ११.५१ लाख कोटी रुपयांवर पोहोचले.