
<< विनायक
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी खेड्यापासून शहरांमधल्या रस्त्यांची दुरुस्ती, त्यांचं डांबरीकरण अथवा काँक्रिटीकरण असे रस्ते बांधण्याची गती, त्यातील तांत्रिक प्रगती, उणिवा आणि नंतर खड्ड्यांची मोजदाद वगैरे गोष्टींची जनतेला वर्षानुवर्षे सवय आहे. मिळेल त्या मार्गावरून लोक मार्गक्रमण करतच राहतात. एखादाच भक्कम रस्ता बराच काळ वाहन व्यवस्था सुरळीतपणे आरपार नेत असतो. त्यावर चर्चा, लेख याही गोष्टी सर्वसामान्यांना नेहमीच्याच.
पावसाळ्यात रस्ते निर्धोक असावेत एवढीच सामान्यांची अपेक्षा असते. या मार्ग ‘अनिवार्यते’मुळे एकूणच इतिहास काळापासूनच्या मार्गांचा मागोवा घेणे इष्ट. माणसाच्या स्थिर वसाहत्तीच्या काळात ‘मार्ग’ सुधारणेने जन्म घेतला असं म्हणता येईल. कारण तोपर्यंत फिरस्ते समूह जगभग ‘वाट मिळेल तिथे’ चालत जात होते. पुढे घोड्यांसारखी वाहनं आली. बळकट प्राण्यांवर भार टाकून आपला प्रवास सुखकर करण्याची युक्ती माणसाला सापडली. त्यानंतर मात्र चाकाचा शोध लागल्यावर वाहक गाड्या नेताना सपाट रस्त्यांची गरज भासू लागली.
तसा रस्त्यांचा इतिहास अनेक हजार वर्षांचा मोहेंजोदारो, लोथल-डोलावीरासारख्या सिंधू संस्कृतीमधल्या नगरांमधून मार्गांची केलेली आखीव-रेखीव रचना चकित करणारी आहे. पक्क्या विटा किंवा कातीव पत्थर अथवा फरश्यांचे तत्कालीन मार्ग मजबूत असत. अशाच मार्गांची रचना उत्तर हिंदुस्थानातील जुन्या शहरांत आजही दिसते. पाश्चात्त्य देशांत ग्रीस-इटलीमध्येही असेच रस्ते असत. मुंबईतही काही ठिकाणी दगडी पदपथ होतेच. आता त्यांचेच आधुनिक रूप ‘पेव्हर ब्लॉक’च्या पद्धतीने आले आहे.
महामार्ग किंवा हमरस्ते चिकट माती, दगडांची खडी (ग्रॅव्हेल) आणि प्रसंगी चुनखडीच्या गिलाव्याने (मॉर्टर) चिकटवलेल्या फरश्या अथवा विटा यांचे असायचे. एरवी खेडोपाड्यांत मातीच्याच पायवाटा, बैलगाडी, घोडागाडीसाठीचे रस्तेही माती चोपून बनवलेले असत. पावसाळ्यात, मातीचा चिखल होऊन या गाड्यांमुळे ‘चाकोरी’ (रट) तयार होत. चाकोरी म्हणजे गरगरत्या चाकांनी तयार झालेले चाकाच्या रुंदीच्या आकाराचे खोल खड्डे. रेल्वेमार्ग टाकण्याच्या वेळी दोन रुळांतल्या अंतराचा हिशेब सुरुवातीला या ठरावीक चाकोरीवरूनच केला गेला असं म्हटलं जातं. नंतरच्या काळात ‘चाकोरीबद्ध’ किंवा ‘रुळलेले’ जीवन असे शब्दप्रयोग भाषेतही आले ती यंत्रयुगाची देणगी. विविध काळात तत्कालीन यंत्रयुगाने कोणकोणत्या शब्दांची भर संपर्क भाषेत टाकली तो वेगळाच विषय होईल.
सध्या जगात मुख्यत्वे दोन प्रकारचे रस्ते बनवले जातात. डांबरी आणि काँक्रीटचे. त्याशिवाय छोटे मार्ग, पूल, लोखंडी, लाकडी किंवा काचेचेही असतात, परंतु शेकडो किलोमीटरचे महामार्ग डांबरी अथवा काँक्रीटचेच. यापैकी डांबरी रस्त्यांची सुरुवात 1902 मध्ये इंग्लंडमधील नॉटिंगहॅमशर येथून झाली. त्यापूर्वीही 1834 मध्ये जॉन मॅकडॅम या इंजिनीअरने द्रवरूप डांबरात खडी मिसळून रस्ते बनवण्याचा प्रयोग केलाच होता. आजही बारीक खडीमिश्रित डांबराचा जो थर डांबरी रस्त्यांसाठी वापरला जातो त्याला ‘मॅकडॅम’ यांचंच नाव आहे.
एडगर हुली यांनी विसाव्या शतकाच्या आरंभी इंग्लंडमध्ये डांबरी रस्त्यांचा ‘प्रसार’ करायला सुरुवात केली आणि त्यांचं लोण हिंदुस्थानपर्यंत पोहोचलं. तोपर्यंत पेट्रोलियम उत्पादन असलेलं डांबरही विपुल प्रमाणात उपलब्ध झालं होतं. 1914 मध्ये चेन्नई येथे आपल्या देशातला पहिला डांबरी रस्ता तयार झाला.
मेटल ग्रॅव्हेल किंवा मोठ्या पाषाणांची साधारण चार सेंटिमीटर आकाराच्या छोट्या दगडांची खडी बनवून ती मातीत घट्ट चोपून सपाट रस्ते तयार करण्याची पद्धत आपल्या देशात प्राचीन काळापासून होती. सम्राट अशोकाच्या काळात पाटलीपुत्रच्या मगध साम्राज्यापासून वायव्येला (नॉर्थ-वेस्ट) पेशावरपर्यंत जो महामार्ग बांधला गेला तो दगडमाती-चुन्याचा वापर करूनच. याच मार्गाचं पुनरुज्जीवन इंग्रजांनी कालांतराने ‘ग्रँड ट्रंक रोड’ या नावाने केले.
काँक्रीटच्या रस्त्यांचा मार्ग स्थापत्य विशारदांना सापडला तो 19 व्या शतकात नुकत्याच वापरात येऊ लागलेल्या सिमेंट काँक्रीटचा रस्ताही करता येतो हे 1865 मध्ये स्कॉटलँडमधल्या इन्व्हरनेस येथे प्रयोगांती सिद्ध झालं. मात्र त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला तो अमेरिकेत ओहायो राज्यात 1891 मध्ये बेलेफॉन्टेन येथील काँक्रीटचा मोठा मार्ग बांधल्यावर हा रस्ता आजही वापरात आहे.
मुंबईत 1940 मध्ये पालनजी मिस्त्री यांनी मरीन ड्राईव्ह प्रोमोनेड हा काँक्रीटचा मार्ग बांधला. मात्र तो कमी लांबीचा होता. पुढे 1989 मध्ये या मार्गाचं काँक्रिटीकरण झालं. आता गावखेड्यापर्यंत काँक्रीटचे रस्ते पोहोचलेत.
मोहेंजोदारो संस्कृतीमधली शहरं हिंदुस्थानातही आहेत. तेथील ‘मार्ग’ आजही पाहता येतात. याशिवाय गेल्या काही वर्षांत काँक्रीटच्या महामार्गांचं जाळं देशभर उभं राहत आहे. आपल्या देशातील प्रचंड पाऊस, कडक उन्हाळा आणि अफाट लोकसंख्येचा विचार करूनच असे मार्ग बांधले जात असतील तरच ते दीर्घायुषी ठरतील अन्यथा दुरुस्तीचाच कार्यक्रम अव्याहत सुरू राहील. याबाबत पुण्याच्या भक्कम बांधणीचा ‘जंगली महाराज मार्ग’ आदर्श नजरेसमोर असावा.



























































