
कित्येक वर्षे त्याच्या नावामागे एक टोमणा चिकटला होता, ग्रॅण्डस्लॅम न जिंकलेला सर्वोत्तम खेळाडू! पण रविवारी रोलाँ गॅरोच्या लाल मातीवर अलेक्झांडर झ्वेरेवने तो शिक्का कायमचा पुसून टाकला. तीन ग्रॅण्डस्लॅम अंतिम फेरीतील हृदयद्रावक पराभवानंतर अखेर चौथ्या प्रयत्नात त्याने फायनली स्वप्न साकार केले. फ्लाव्हिओ कोबोलीचा 6-1, 4-6, 6-4, 6-7 (6), 6-1 असा पराभव करत त्याने आपल्या कारकिर्दीतील पहिले ग्रॅण्डस्लॅम जेतेपद पटकावले आणि फ्रेंच ओपनला नवा विजेता गवसला.
कोबोलीचा अखेरचा फटका सीमारेषेबाहेर जाताच झ्वेरेव गुडघ्यावर कोसळला. काही क्षण तो लाल मातीवर निश्चल पडून राहिला आणि नंतर त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. अनेक वर्षांची झुंज, अपयशाचे चटके आणि अपूर्ण राहिलेली स्वप्ने अखेर पूर्णत्वाला पोहोचली होती. 29 वर्षीय झ्वेरेव ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद जिंकणारा इतिहासातील सातवा सर्वांत वयोवृद्ध प्रथमविजेता ठरला. तसेच 1996नंतर ग्रॅण्डस्लॅम जिंकणारा पहिला जर्मन पुरुष खेळाडू बनला.
तीन जखमा, चौथ्यांदा विजयाचा मलम
झ्वेरेवच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी वेदना म्हणजे अंतिम फेरीतील अपयश. 2020च्या अमेरिकन ओपनमध्ये डॉमिनिक थिएमविरुद्ध विजय दारात उभा असताना तो हातातून निसटला. 2024 फ्रेंच ओपनमध्ये कार्लोस अल्काराझविरुद्ध दोन सेट जिंकूनही त्याला पराभव पत्करावा लागला. त्यानंतर 2025 ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत यानिक सिनरने त्याला एकतर्फी हरवले. मात्र या वेळी झ्वेरेवने इतिहासाची पुनरावृत्ती होऊ दिली नाही. दबावाच्या क्षणी तो कोसळला नाही; उलट अधिक आक्रमक बनला.




























































