
मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरात देशविदेशातून भाविक दर्शनाला येतात. ऐन उन्हाळ्यात भाविकांना उन्हाचे चटके सोसत दर्शनाच्या रांगेत उभे रहावे लागते. विशेषतः महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक यांना उष्णतेचा तडाका सहन करावा लागतो. यासंबंधीचे वृत्त दैनिक ‘सामना’ने प्रकाशित केले होते. त्यानंतर मंदिर प्रशासनाने प्रतिबंधात्मक पावले उचलली आहेत. महालक्ष्मी मंदिर परिसरात आता हीट शेल्टर उभारण्यात आले आहे.
महालक्ष्मी मंदिरात रोज हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनाकरिता येतात. त्यांना उष्णतेच्या तडाख्याने होणारा त्रास सामाजिक कार्यकर्ते राजेश माजगुणकर यांनी लक्षात आणून दिला. त्यानंतर मंदिराचे महाव्यवस्थापक व व्यवस्थापक शेखर दांडेकर व नितीन कांबळी यांनी पुढाकार घेऊन स्थानिक रहिवासी यांच्या सहकार्याने धाकलेश्वर चौक ते मंदिराच्या पायऱयांपर्यंत ‘हीट शेल्टर’ ची सुविधा केली आहे.
भविष्यात राज्य सरकारने व बृहन्मुंबई महानगरपालिका किंवा आमदार, खासदार यांच्या निधीतून भक्तांच्या सुविधेसाठी कायमस्वरूपी सभा मंडप/ शेडसाठी प्रयत्न करावे. जेणेकरून उन्हाळयात, पावसाळ्यात भक्तांना सुलभ दर्शनाकरिता अडचण होणार नाही, अशी मागणी राजेश माजगुणकर यांनी केली आहे.




























































