
पालघर जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेचे बारा वाजले आहेत. बोईसर-चिल्हार रस्त्यालगत असलेल्या दामाखिंड गावातील डबका पाड्यात डबक्यातदेखील खडखडाट असून दोन हंडे पाणी घेण्यासाठी महिलांना विहिरीवरच दोन दिवस मुक्काम करावा लागतो. तरीदेखील प्रशासनाच्या हृदयाला पाझर न फुटल्याने आदिवासींमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.
तारापूर एमआयडीसी तसेच वसई-विरार महापालिकेला सूर्या नदीतून लाखो लिटर पाणीपुरवठा केला जातो. त्याच परिसरातील स्थानिक आदिवासी समाजाला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. उद्योजक व शहरी भागाला पाणी उपलब्ध करून दिले जाते, मात्र स्थानिक भूमिपुत्रांना दोन हंडे पाणीही सहज मिळू नये, यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते, असा सवाल ग्रामस्थांकडून केला जात आहे.
कायमस्वरूपी योजना द्या
‘जलजीवन मिशन’च्या माध्यमातून पाणीपुरवठा होईल, या आशेवर आजही स्थानिक आदिवासी बांधव आहेत. शासनाच्या योजना केवळ फलकापुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन डबका पाड्यात कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.
डबका पाडा येथे बोरिंग मारण्यात आली होती. मात्र तेथे पाणी लागले नाही. तरी येत्या दोन ते तीन दिवसांत डोलारे पाडा येथून पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे, असे कोंढाणचे ग्रामपंचायत अधिकारी निखिल चव्हाण यांनी सांगितले.
डोलारे पाडा आमच्यापासून खूप अंतरावर आहे. तिथेही जी बोरिंग मारली आहे त्यातून त्या पाड्याला आवश्यक पाणी मिळेल असे वाटत नाही. शिवाय तो पाडा आमच्याच विहिरीवर पाण्यासाठी अवलंबून आहे. त्यामुळे हा पर्याय फारसा व्यवहार्य वाटत नाही, अशी प्रतिक्रिया दामाखिंड डबका पाडा येथील स्थानिक ग्रामस्थ योगेश्वर डबका यांनी दिली.

























































