रायगडात दुपारच्या शाळांची घंटा सकाळीच; कडक उन्हाच्या तडाख्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

मान्सूनचे आगमन लांबले असतानाच उष्णतेचा पाराही वाढत चालला आहे. रायगड जिल्ह्यात ३३ ते ३५ अंश एवढे तापमान असल्याने जिल्हा परिषदेच्या व खासगी शाळांची दुपारची घंटा आता सकाळीच वाजणार आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबतचा आदेश काढला असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळा ३० जूनपर्यंत फक्त सकाळच्या सत्रात भरणार असून विद्यार्थ्यांना उष्णतेचा कोणताही त्रास होऊ नये यासाठी ही काळजी घेण्यात आली आहे. रायगडातील ३ हजार १२७ अंगणवाड्या व २ हजार ४४७ शाळा आता सकाळी भरणार आहेत.

जून महिना अर्धा संपून गेला तरीही अद्यापि पाऊस न झाल्याने शेतकरी वर्ग एकीकडे चिंतेत असतानाच पिण्याच्या बाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाऊस लांबला बरी उष्णतेच्या झळा मे महिन्याप्रमाणेच बसत असल्याने पारच्या सत्रात भरणाऱ्या शाळा आता सकाळीच भरवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. उष्णतेमुळे मुलांच्या भारोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. याशिवाय हवामानात बदल झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाला शाळांचे वेळापत्रक बदलण्याचे आदेश दिले आहेत.

नवे वेळापत्रक

रायगड जिल्हा परिषदेच्या शाळा १० ते ५ तर काही खासगी शाळा साधारण ११ ते ४ व १२ ते ५ यादरम्यान भरतात. जिल्हाधिकारी यांच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील दुपारच्या सत्रात भरणाऱ्या सुमारे ३ हजार १२७ अंगणवाड्या तसेच २ हजार ४४७ शाळांची घंटा सकाळच्या सत्रात वाजणार आहे. तर उर्वरित १ हजार १२७शाळा या सकाळच्या सत्रात भरत असल्याने या शाळांच्या वेळापत्रकात बदल होणार नसल्याचे सांगण्यात आले.

सकाळच्या सत्रात शाळा भरवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहेत. त्यानुसार सर्व शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. पालकांनीही विद्यार्थ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

संतोष शेडगे, (उपशिक्षणाधिकारी, रायगड जिल्हा परिषद)

जिल्हाधिकाऱ्यांनी १९ ते ३० जूनदरम्यान शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश दिले आहेत. सदर आदेश गुरुवारी उशिरा जारी करण्यात आले.

या आदेशाची प्रत शाळांपर्यंत पोहोचण्यास उशीर झाला. यामुळे आज जिल्ह्यातील काही शाळा दुपारच्या सत्रात सुरू होत्या. मात्र उद्यापासून नव्या वेळापत्रकानुसार शाळा भरणार आहेत. हवामान विभागाने रायगड जिल्ह्यात पुढील ४ दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या दिवसात जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दुपारच्या वेळेत शाळेत ये-जा करताना मुलांना उष्णतेचा फटका सहन करावा लागत होता. उष्णतेमुळे मुलांना आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत आहे. सकाळच्या सत्रात शाळा भरवल्याने मुलांना उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे.

विजय पाटील (पालक)