
वाशी नाका येथील इंदिरा नगरात पानटपरीच्या आडून गांजा व कोरेक्स विक्रीचा गोरखधंदा करणाऱया एका महिलेला आरसीएफ पोलिसांनी गजाआड केले. आपला चेहरा समोर येऊ नये याकरिता ती ड्रग्ज तस्कर महिला परिसरातील लहान मुलांकरवी गांजा, कोरेक्सची विक्री करायची अशी तक्रार नागरिकांनी केली आहे.
रेल्वे पटरी तसेच पार्ंकग केलेल्या ट्रकच्या मागे दोघेजण गांजा व कोरेक्सची विक्री करत असल्याची तक्रार इंदिरा नगरातील नागरिकांनी आरसीएफ पोलिसांकडे केली होती. याची दखल घेत पोलिसांनी गांजा विकताना दोघांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून एक हजार किलो गांजा जप्त करण्यात आला. आरोपींमध्ये एक अल्पवयीन मुलाचा समावेश होता. हा गांजा नसरिन खान (45) हिने विकण्यासाठी दिल्याचे अटक आरोपींकडून सांगण्यात आले. दरम्यान दुसऱया दिवशी नसरिन हिने पोलिसांना आपल्याविरोधात माहिती दिली म्हणून बहीण व तिच्या पतीवर प्राणघातक हल्ला केला. माणसं पाठवून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी नसरिनचा शोध घेतला असता तिला लोणावळय़ातून अटक केली. यामुळे संतापलेल्या नसरिन हिने आपल्या अल्पवयीन मुलीला सांगून बहिणीच्या पतीविरोधात पोक्सोची तक्रार देण्यास सांगितले. याप्रकरणी आरसीएफ पोलीस अधिक तपास करीत आहेत. पण नसरिन लहान मुलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकरीता ड्रग्जची विक्री करते अशी तक्रार तिच्याविरोधात करण्यात आली.
























































