
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास सोमवार पासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकारच्या फसव्या कर्जमाफीविरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. नको अटी नको शर्ती…शेतकऱ्यांना हवी कर्जमुक्ती, अशी प्रचंड घोषणाबाजी करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवन परिसर दणाणून सोडला.
महायुतीने सत्तेत येताना शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचे वचन दिले होते. प्रत्यक्षात सत्तेत आल्यानंतर मात्र भरमसाठ अटी व शर्ती लादून शेतकऱ्यांना फसवी कर्जमाफी देण्यात आली आहे. आज विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर या फसव्या कर्जमाफीच्या विरोधात विरोधी पक्षांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. सत्ताधाऱ्यांनी दिलेले वचन पूर्ण करावे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी आक्रमक मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.
शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झालाचं पाहिजे…. विधिमंडळच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीचे आंदोलन pic.twitter.com/lzbwSWh6Rb
— Saamana Online (@SaamanaOnline) June 22, 2026
दरम्यान, अधिवेशन सुरू होण्यापूर्वी महाविकास आघाडीतील सर्व आमदारांनी विधान भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, आमदार भास्कर जाधव, आमदार अंबादास दानवे, आमदार वरुण सरदेसाई, आमदार महेश सावंत, काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार, आमदार सतेज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे इतर नेते उपस्थित होते.


























































