तामिळनाडू गॅस गळती प्रकरण, मृत्यू झालेल्या पाचही महिला कामगार ओडिशातील रहिवासी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तमिळनाडूच्या तिरुवल्लूर जिल्ह्यातील सी फूड फॅक्टरीत रविवारी अमोनिया वायूची गळती झाली. यात पाच कामगारांचा मृत्यू झाला. हे सर्व कामगार ओडिशातील रहिवासी असून, त्यांचे मृतदेह लवकरात लवकर त्यांच्या मूळ गावी (केओन्झार जिल्हा) आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे ओडिशाचे कामगार मंत्री गणेश राम सिंगखुंटिया यांनी सोमवारी सांगितले.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पेरियापालयमजवळील कनिगाईपायर-मंजंगारनाई भागातील कारखान्यात ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एकूण 74 कामगार बाधित झाले असून, 67 जणांवर उपचार सुरू आहेत. आमचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत आणि त्यांनी ओडिशातील पाच महिलांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे, असे ओडिशाचे कामगार आयुक्त इंद्रमणी त्रिपाठी यांनी सांगितले. बाधित कामगारांवर उपचार आणि इतर मदत सुनिश्चित करण्यासाठी ओडिशा सरकार तमिळनाडू प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे, असे एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

ओडिशा सरकारच्या अधिकाऱ्यांचे एक पथकही तमिळनाडूला रवाना झाले असून ते उपचार, शवविच्छेदन प्रक्रिया आणि इतर व्यवस्थांबाबत स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत आहेत, असेही निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, काही जखमी कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.