
लहान मुलांच्या खेळण्यांची झालेली मोडतोड, उद्यानात बसण्यासाठी असलेल्या जागांना गेलेले तडे, पाण्याचे चोरीला गेलेले नळ अशी दुरवस्था गोरेगाव पूर्व येथील शहीद विजय साळसकर उद्यानाची झाली असून पालिका प्रशासनाने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या उद्यानाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने पालिका प्रशासनाकडे केली आहे.
गोरेगाव पूर्व येथील शहीद विजय साळसकर या उद्यानात आरे आणि परिसरातील आबालवृद्ध येतात. मात्र उद्यानाची सध्या दुरवस्था झाल्यामुळे या उद्यानातील वर्दळ आता कमी झाली आहे. शहीदांच्या नावाने असलेल्या उद्यानाची ही अवस्था अस्वीकार्य आहे, अशी नाराजी व्यक्त करत शिवसेना शाखा क्र. 52 चे शाखाप्रमुख संदीप गाढवे यांनी या उद्यानाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. मुंबई महानगरपालिका प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन उद्यानामधील लाईट आणि पाणी व्यवस्था सुरळीत करावी, स्वच्छतागृहाची दुरुस्ती करावी, मोडकळीस आलेली खेळणी व बाकडी तत्काळ बदलावीत अशी मागणी त्यांनी केली आहे.
महिला, मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
या उद्यानात अनोळखी व्यक्तींचा वावर तसेच रात्री गर्दुल्ल्यांचा वावर असतो. त्यामुळे महिला आणि मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. ज्या उद्यानात मुलांनी खेळावे, नागरिकांनी फिरावे, तेथे असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांच्यादेखील सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे या उद्यानात तत्काळ सीसी टीव्ही कॅमेरे बसवावे आणि सुरक्षारक्षक नेमावे, अशी मागणी शाखाप्रमुख संदीप गाढवे यांनी केली.
























































