उड्डाणापूर्वीच प्रकृती बिघडली, अबूधाबीहून बंगळुरूला जाणाऱ्या विमानात हिंदुस्थानी नागरिकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अबूधाबीहून बंगळुरूला चाललेल्या विमानात एका 51 वर्षीय हिंदुस्थानी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. विमानाने उड्डाण घेण्यापूर्वीच युसूफ कन्हाम्मू यांची प्रकृती बिघडली. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र हृदयविकारामुळे युसूफ यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, युसूफ हे व्हिजिट व्हिसावर अबूधाबी येथे राहणाऱ्या पुतण्याकडे गेले होते. पुतण्याला भेटल्यानंतर सोमवारी ते हिंदुस्थानात परतत होते. विमानाने उड्डाण घेण्यापूर्वीच युसूफ यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. केबिन क्रूने त्वरीत वैद्यकीय मदत मागितल्यानंतर पॅरामेडिक्स त्यांना तपासण्यासाठी विमानात आले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तिथे पोहोचताच त्यांना मृत घोषित करण्यात आले.

या घटनेमुळे विमानाचे उड्डाण काही काळ लांबणीवर पडले आणि त्यानंतर विमान पुढील प्रवासासाठी रवाना झाले. युसूफ यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि पाच मुले असा परिवार आहे. त्यांचा मृतदेह केरळमधील त्यांच्या मूळ गावी नेण्याची व्यवस्था करत आहेत.