
कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात येत असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील उक्षी फाटा परिसरात पुन्हा एकदा प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचे विदारक चित्र समोर आले आहे. पावसाच्या पहिल्याच सरींमध्ये महामार्गावर ढोपरभर पाणी साचल्याने वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. महामार्गावरील या धोकादायक परिस्थितीमुळे संतापाची लाट उसळली आहे.
गेल्या तब्बल 18 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत प्रशासन आणि संबंधित यंत्रणांच्या निष्काळजीपणाचा फटका आता थेट सर्वसामान्यांना बसत आहे. उक्षी फाटा येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून, दुचाकीस्वारांवर चिखलाचा अक्षरशः अभिषेक होत आहे. पादचारी आणि वाहनचालकांना चिखलातून वाट काढत प्रवास करावा लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, नुकतेच करण्यात आलेले काँक्रीटीकरणही अनेक ठिकाणी उखडल्याचे चित्र असून, कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही प्रभावी गटार व्यवस्था नसल्याने पावसाचे पाणी थेट महामार्गावर साचत आहे.
परिणामी, रस्त्यावर चिखल आणि मातीचे साम्राज्य निर्माण झाले असून वाहन घसरून मोठे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.एकीकडे महामार्ग पूर्णत्वास नेण्याच्या घोषणा केल्या जात आहेत, तर दुसरीकडे प्रत्यक्षात महामार्गाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. एखादा गंभीर अपघात घडल्यानंतरच संबंधित यंत्रणा जागी होणार का, असा संतप्त सवाल आता नागरिक आणि वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे. महामार्गावरील या समस्येकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित कंत्राटदारांनी तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.




























































