
संत लाडाई या संत नामदेवांची थोरली सून. आज संत लाडाईंचे केवळ दोनच अभंग उपलब्ध आहेत. नामदेवांच्या समाधीसमयी त्या हयात होत्या. त्या पंढरपुरात नसताना त्यांच्या कुटुंबाने विठ्ठलचरणी शांत होण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना तीव्र दुःख झाले होते. ‘सवानी हा देह अर्पिला विठ्ठली। मज का ठेविले पापिणीसी वेगळी।।’ असे म्हणत त्या स्वत:चा धिक्कार करतात. माणसांच्या भरल्या घरात एकटीच उरल्याने अनाथ झाले असे वाटत त्यांनी आपले मूल आईपाशी ठेवून परमार्थ मार्ग स्वीकारला. संत नामदेवांच्या उर्वरित कुटुंब सभासदांच्या अभंगांचा संत तुकारामांनी एका अभंगात परामर्श सादर केला आहे. ‘चौऱ्याण्णव लक्ष रंगाईची वाणी। प्रेमे चक्रपाणी आळविले। दोन कोटी अभंग राजाईची करूना। प्रेम नाराण आळविले.।।’ संत नामदेवाचे कुटुंब विठ्ठलमय होते. अभंग लिहीताना लाडाईंनी अलंकारिक भाषा वापरली नाही, ना शब्दांवर जोर दिला.



























































