आरोग्य – आहारशैली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. आशुतोष कुलकर्णी

सध्या आहारशैलीबाबत अनेक समजगैरसमज प्रचलित आहेत. मात्र आयुर्वेदानुसार आपल्या प्रकृतीनुसार आणि भुकेनुसार आहार घेणे योग्यच ठरते

“डॉक्टर, मी दिवसातून किती वेळा खाल्ले पाहिजे?” अशी अनेकदा विचारणा होते. त्यात मतमतांतरे खूप आहेत. कोणी म्हणते दिवसातून दोन वेळा जेवा, कोण सांगतात तीन वेळा खा. कोणी दिवसभर थोडे थोडे चारपाच वेळा खा.

आयुर्वेदानुसार मात्र आपल्या प्रकृतीनुसार आणि भुकेनुसार आहार घ्यायला सांगितला आहे. जेवणाची वेळ झाली म्हणून जेवण्यापेक्षा भूक लागली तरच खाणे किती जण करत असतील? फार थोडे जण असतील. आपल्या आहारासह त्याची वेळदेखील महत्त्वाची आहे. खाण्यापिण्याची योग्य वेळ आपल्या चांगल्या आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. चुकीच्या वेळी जेवण केल्याने आपल्या शरीराला पोषक घटकांचा फायदा मिळण्याच्या ऐवजी तोटा सहन करावा लागू शकतो. म्हणून योग्य वेळी योग्य आहार घेणं आपल्या चांगल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

आपले शरीर सकाळी तर अन्नाचे पचन सहजपणे करतो, पण सूर्य मावळल्यावर आपली पचनक्रिया मंदावते. म्हणून  आपली आहार तालिका त्यानुसार बनवावी.

न्याहारीची वेळ : सकाळी 7 ते 8ची वेळ ही न्याहारीसाठी उत्तम असते. ही गोष्ट लक्षात घ्या की, सकाळी उठल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत काहीतरी खाऊन घ्यावं. जास्त काळ उपाशी राहिल्यामुळे आसिडिटी, पोटफुगी गॅसचा त्रास होऊ शकतो.

दुपारचे जेवण :  दुपारचे जेवण दुपारी 12 ते 2 वाजेच्या दरम्यान खावं. न्याहारी आणि दुपारच्या जेवणाच्या दरम्यान किमान चार तासांचे अंतर असावे.

रात्रीच्या जेवणाची वेळ :  रात्री 7 ते 9च्या दरम्यान खाणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी थोडं हलकं अन्न खावे.

हे सर्वसाधारण नियम आहेत.

भूक लागलेली नसताना जेवल्यास अन्नपचन नीट होत नाही. त्यामुळे पोटफुगी आणि आम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो. सर्वसाधारणपणे योग्य प्रमाणात घेतलेला आहार तीन ते चार तासांनी जठरातून लहान आतडय़ांत जातो. त्यामुळे दोन आहारांमध्ये कमीत कमी तीन ते चार तासांचे अंतर असावे. भूक नसताना केवळ जिभेला चटक लागते म्हणून खाल्ल्याने अर्धवट पचलेल्या अन्नामध्ये नवीन अन्न मिसळले जाते आणि आरोग्याची हानीच होते.

सकाळी शौचाला झाल्याविना आणि कडक भूक लागल्याविना आहार घेणे हे सर्व विकारांचे एक महत्त्वाचे कारण आहे. शौचाला होऊन कडक भूक लागल्यावरच आहार घेणे ही निरोगी आयुष्याची चावी आहे.

नित्य व्यायाम करणाऱ्या व्यक्तींना आणि अंगमेहनत करणाऱ्यांसाठी आहाराचे नियम थोडे वेगळे आहेत. व्यायाम करणाऱयांनी दिवसातून तीनचार वेळा खाण्यास हरकत नाही. व्यायामामुळे हृदयाची गती वाढते. त्यामुळे शरीरात निर्माण झालेला आम पचण्यास साहाय्य होते. व्यायामामुळे आळस आणि जडपणा दूर होऊन उत्साह अन् हलकेपणा येतो. अगदी घरात बागेत काम करूनदेखील शरीराची हालचाल होण्यास मदत होते. अशा वेळी आपोआपच नैसर्गिक भुकेची जाणीव होते आणि खाल्लेले अन्न पचायला मदत होते.

आदल्या दिवशी खाल्लेले अन्न पचले आहे हे कसे ओळखावे? सकाळी उठल्यावर मलमूत्र यांचे योग्य निसरण झाले तसेच वायू व्यवस्थित बाहेर पडला तर पचन व्यवस्थित झाले आहे असे समजावे. त्याचप्रमाणे पोट फुगलेले नसणे, छातीत जडपणा नसणे, ढेकर शुद्ध असणे, त्याला अन्नाचा किंवा करपट वास नसणे, कडकडून भूक लागणे, झोप पूर्ण झाल्याचे समाधान असणे, जीभ स्वच्छ असणे, सर्व शरीरात हलकेपणा जाणवणे. ही अन्न पूर्ण पचन झाल्याची लक्षणे आहेत. अशा वेळी जेवण घेण्यास हरकत नाही .

एका योगी पुरुषाला एकाने प्रश्न विचारला की, “योगी म्हणून तुम्ही आतापर्यंत काय मिळवलं?” त्यांनी एकच वाक्यात सांगितले की, “भूक लागली की, खातो आणि झोप आली की, झोपतो.”

बघा, विचार करा, आपल्याला हे शक्य आहे का?

[email protected]