स्त्री-लिपी – त्रिवेणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी, [email protected]

 ‘कथाकार’ विजया राजाध्यक्ष यांना वगळून मराठी कथेचा इतिहास लिहिताच येणार नाही. मात्र यासोबत त्यांनी निभावलेल्या प्राध्यापक व समीक्षक या भूमिकाही त्यांच्यातील साहित्यिकेची आगळी सिद्धता दर्शवतात.

कथाकार, समीक्षक आणि प्राध्यापक या तिन्ही भूमिकांतून विजया राजाध्यक्ष गेलं अर्धशतक साहित्य क्षेत्रात वावरत होत्या. त्यांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाची ही त्रिवेणी किंवा तीनपेडी गुंफण फार वेधक आहे. आज या सदरात मुख्यत त्यांच्या कथाकार रूपाची माहिती घ्यायची आहे. कारण वीसपेक्षा अधिक कथासंग्रहांतील जवळ जवळ अडीचशे कथा त्यांच्या नावावर आहेत. लेखन सातत्य, लेखन वैपुल्य आणि गुणवत्ता या सर्व दृष्टींनी अतिशय लक्षणीय कथा निर्मिती त्यांनी केली आहे. ‘कथाकार’ विजयाबाईंना वगळून मराठी कथेचा इतिहास लिहिताच येणार नाही. गंमत म्हणजे त्या कवितांच्या लोभी. पहिलं प्रेम कवितेचं.

सातत्याने त्यांनी कवितेची समीक्षा केली, मर्ढेकर आणि विंदा करंदीकर यांच्या कवितेचा खोलवरचा शोध घेत राहिल्या. ‘कवितारती’सारखं सुंदर समीक्षा-पुस्तक लिहिलं तरी समांतरपणे त्यांचं कथालेखनही चालूच राहिलं. बाई मूळच्या कोल्हापूरच्या. तिथे काही तरुण, उत्साही लेखक एकत्र आले होते. शंकर पाटील, रणजित देसाई, पुरुषोत्तम पाटील, प्रल्हाद वडेर अशी मंडळी एकत्र जमून साहित्य चर्चा करीत. विजयाबाई या समविचारी गटात सामील झाल्या. त्यांच्या दृष्टीने ते व्यक्तिमत्त्वाचा पूर्ण कब्जा घेणारे, वाचन-लेखनाखेरीज इतर ध्यास नाहीसे करणारे वातावरण होते. बाईंना लेखनाच्या अगदी सुरुवातीलाच हे वातावरण लाभले. मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांच्याशी  विवाह होऊन मुंबईला आल्यावर अधिक व्यापक साहित्य क्षेत्रात त्यांचा प्रवेश झाला.

प्राध्यापकी आणि लेखन हातात हात घालून सुरू झालं. इतर अनेक व्यापताप सांभाळत असतानाही बाई सतत कथा लिहीत राहिल्या. 65 मध्ये त्यांचा ‘अधांतर’ हा संग्रह प्रकाशित झाला. तिथपासून 2001 च्या ‘आधी..नंतर’ या संग्रहापर्यंत 40 वर्षांतील स्त्री जीवनाचा आलेख त्यांच्या कथांतून सहज, पण निश्चितपणे उमटला आहे. समाज बदलत गेला तसे स्त्रीचे प्रश्न बदलत गेले. या प्रश्नांचाही मागोवा त्यांच्या कथांतून घेता येतो. घराबाहेर पडणारी राहणारी स्त्री, नोकरी करणारी,  शिक्षणासाठी वसतिगृहात राहणारी स्त्री, रक्ताच्या नात्याशिवाय इतरही नात्यांनी सभोवतालच्या माणसांशी जोडली गेलेली स्त्री…तिचे अनुभव, तिच्या स्वतच्या जगण्याविषयीच्या कल्पना,परंपरेने आखून दिलेल्या चौकटीबाहेरचे निर्णय घेताना आलेले धाडस, थोडी भीती हे सारे अत्यंत सजगपणे आणि संवेदनशीलतेने बाईंनी व्यक्त केले आहे.

स्त्रीच्या विशिष्ट शरीरामुळे तिच्या वाटय़ाला काही अनुभव येतात. मासिक पाळी, गर्भारपण, बाळंतपण, रजोनिवृत्ती, स्त्री-पुरुषांतील लैंगिक संबंधांचा स्त्रीदेहावर आणि मनावर होणारा स्थूल-सूक्ष्म परिणाम, त्यातली भीती, उत्सुकता आणि थरार, क्वचित येणारी विरक्ती, शारीरिक निकटतेतही जाणवणारे एकटेपण, गरोदरपणी बदलत जाणारे शरीर, प्रसूतीचा अनुभव हे त्यांच्या कथेतून प्रथमच आले आणि फार कलात्मक पद्धतीने आले. ‘विदेही’, ‘कमळ’ या त्यांच्या कथा आवर्जून वाचाव्यात अशा आहेत. याशिवाय नोकरीच्या ठिकाणी होणारे स्त्रीचे शोषण त्यांनी समर्थपणे मांडले, धीटपणे मांडले, समजुतीने मांडले. त्यांचे कथाविश्व प्रामुख्याने स्त्री-लक्ष्यी आहे. स्वतला शोधणारी स्त्री ‘जानकी देसाईचे प्रश्न’ या कथेत दिसते. लीव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्याचा फार चिकित्सकपणे शोध त्यांनी घेतला आहे. त्याचप्रमाणे त्यांना मृत्यू या विषयाचंही जबरदस्त आकर्षण. त्यावरच्या बऱ्याच कथा त्यांनी लिहिल्या. ‘देह मृत्यूचे भातुके’सारख्या त्यांच्या कथा आजही वेगळेपणाने उठून दिसतात. कलेची निर्मिती आणि स्त्रीची सर्जन क्रिया यांच्याबद्दल त्यांना अपार कुतूहल. त्यामुळेच त्यांच्या कितीतरी कथांत या दोन्हींचा शोध घेतलेला दिसतो. ‘अंधाराचा अर्थ’, ‘कमळाचे तळे’ या कथा आवर्जून वाचाव्यात अशा.

मुंबईसारख्या महानगरातले वेगवान जगणे, मोठय़ा ऑफिसमधली सत्तास्पर्धा, चैनबाजी, उच्चभ्रू लोकांची जीवनशैली हेही त्यांच्या कथेने आपल्या कवेत घेतले आहे. ‘स्वतःभोवती’ वेगाने फिरणाऱ्या नातेसंबंधांच्या, कर्तव्याच्या, कामाच्या चक्रात स्वत एखाद्या स्थिर आसासारखे राहणे आणि तरीही ते चक्र फिरते ठेवणे हे खरे श्रेय असे त्यांनी म्हटले आहे. वाटते की, हेच त्यांचे जगण्याचे तत्त्वज्ञान असावे.

स्त्रीवादाच्या भरातल्या काळात त्या “मला वाद नव्हे, तर संवाद महत्त्वाचा वाटतो’’ असं अगदी निसंदिग्धपणे म्हणाल्या. काळाशी संवादी राहत केलेले स्वतंत्र लेखन आणि साहित्याच्या प्रेमापोटी, ध्यासापोटी सतत कार्यमग्न राहत निर्मिलेले महत्त्वाचे समीक्षा ग्रंथ यामुळे मराठी साहित्य विश्वात विजयाबाईंचं स्थान अढळ आहे.

(लेखिका समीक्षक, संपादक आहेत.)