
अमली पदार्थांचा दुरुपयोग आणि अवैध तस्करीविरोधी आंतरराष्ट्रीय दिवसानिमित्त संपूर्ण मुंबईतील शाळा, कॉलेजे आणि संस्थांमध्ये ‘ड्रग फ्री मुंबई’ मोहिमेअंतर्गत अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानात २९ जूनपर्यंत जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
‘ड्रग फ्री मुंबई’ मोहिमेला आतापर्यंत विविध संस्था, तज्ज्ञ आणि सामाजिक संस्थांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. सद्यस्थितीला ५ हजारांहून अधिक शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, सामाजिक संस्था, शासकीय कार्यालये आदी या मोहिमेशी जोडली गेली आहेत. २५ आणि २६ जून दरम्यान केवळ दोन दिवसांत मुंबईच्या सर्व भागांतील जवळपास ७०० शाळांनी अमली पदार्थविरोधी जनजागृती मोहिमेत सहभाग घेतला आहे. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या तसेच विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्तींचे पुनर्वसन करण्यासाठीची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
गरजू विद्यार्थ्यांना वर्षभर मार्गदर्शन
या मोहिमेला पाठिंबा म्हणून २ हजारांहून अधिक समुपदेशक, मनोविकारतज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ या मोहिमेशी जोडले गेले आहेत. बॉम्बे सायकियाट्रिक सोसायटी, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, प्रजापिता ब्रह्माकुमारीज्, माय भारत (मेरा युवा भारत) यांसारख्या अनेक संस्था मोहिमेशी जोडल्या गेल्या आहेत. या मोहिमेच्या माध्यमातून संपूर्ण वर्षभर समुपदेशन कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. शाळा आणि महाविद्यालयांतील गरजू विद्यार्थ्यांना वर्षभर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.




























































