
>> निर्मोही फडके
माणूस… मग तो कोणत्याही सामाजिक वर्गवारीतील किंवा जीवशास्त्रीयदृष्टय़ा भेद असणारा असो, त्याच्या मनात जगण्याच्या मार्गाआड येणाऱ्या गोष्टींबद्दल खदखद निर्माण होतेच. ही खदखद तो आपल्या नेणिवेच्या तळघरात पुरून टाकतो. पुरलेली खदखद जेव्हा सर्जनाचे रूप घेऊन येते, तेव्हा त्या रूपांत जर नवीनता, प्राधान्य आणि लघुत्व ही तीन वैशिष्टय़े जाणवली, तर ती दखलपात्र ठरतात. आर्थर कोस्लर यांनी प्रतिभावंतांच्या कार्याचे हे तीन विशेष प्रतिपादित केले आहेत. डॉ. सुधीर देवरे लिखित ‘पाय नसलेली माणसं’ या कवितासंग्रहातील कविता वाचताना लक्षात येते की, वर उल्लेखलेल्या तीनही वैशिष्टय़ांसाठी अभियुक्त अशा या कविता आहेत.
‘पाय नसलेली माणसं’ ही तीनही पदे या कवितांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात, तरी ‘पाय असलेली किंवा नसलेली’ अशा शारीरिक वर्गवारीच्याही पलीकडे ‘संवेदना नसलेली’ अशा माणसांच्या जगात आज आपण जगत आहोत याबद्दल चीड येते. ही हतबलता ‘पाय असलेल्या आणि डोके नसलेल्या निर्बुद्ध माणसांत’ गणती करण्यास भाग पाडते.
‘पाय नसलेली माणसं’मधील कवितेचा आकृतिबंध उपजतच एक ठोस विचार आणि कणखर भावनांचे मिश्रण घेऊन आलेला आहे. कवितेच्या आशयानुसार हा आकृतिबंध अनेक ठिकाणी लघुरूपात दिसतो, तर अनेक ठिकाणी दीर्घ स्वरूपात. शीर्षकावरून संग्रहातील कवितेबद्दल वाचकाच्या मनात उत्सुकता निर्माण होते. तीन विभागांच्या रचनेमागे कवीचा स्वतचा एक रचनात्मक आणि निर्णयात्मक विचार आहे हे समजते. पहिल्या भागातील जास्तीत जास्त कविता या काव्यात्मक ‘अनुभव’ कथन करतात, तर पुढील दोन भागांतील अधिकाधिक कविता या ‘संवेदनां’चे शब्दचित्र साकारतात. पैकी दुसऱ्या भागात संवेदनांसह चिंतनाचा पाऊस भेटतो.
‘पाय’ ही या कवितांची संकल्पना असल्याचे लक्षात येते. मात्र त्यानंतर ‘पाय’ असणे, नसणे, कसे, कोणाचे, किती, का इत्यादी प्रश्न निर्माण होतात. एकेक कविता वाचत गेल्यावर लक्षात येते हे ‘पायपुराण’ निश्चितच वेगळे आहे. पाय या अवयवालाच या कवितेने शरीर बहाल करून ‘प्राधान्य’ दिले आहे. या कसोटीवर ‘पाय’ ही या कवितेची ‘लय’ आहे, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये.उदाहरणादाखल- ‘पार्थिव कचऱ्याला गावाबाहेर पडायला आपोआप फुटत नाहीत तंदुरुस्त सशक्त पाय!’ (मोकळा प्लॉट).
‘पाय नसलेली माणसं’मधील कविता ही वाच्यार्थाने बोलणारी कविता नाही, तरीही ती वाचकाला समजणारी आणि उमजणारी कविता आहे. तिच्यातील अनेक रूपके पारंपरिक आहेत. मात्र त्यामधून समोर येणारे अस्तित्वभान हे वाचकाला हेलावून टाकते. उदा. या संग्रहातील अनेक कवितांमध्ये निसर्गाचे अमर्याद अस्तित्व, मानवी भावना इत्यादीचे रूपक म्हणून ‘झाड’ उभे ठाकते. ते पारंपरिक असले तरी या कवितांमध्ये त्याचे स्वरूप ‘अस्वस्थ अनवट’ असे ‘वेगळे’ दिसते.
नेणिवेतील भावनांचा विस्कळीत पसारा हा भाषिक रूपबंधातून आकाराला येतो, तेव्हा तो नवीनता घेऊन येतो. नेणिवेतील दमन केलेले भाव हे भाषेच्या संरचनेत रूपके, प्रतिमा यांच्या अशा ‘अस्वस्थ अनवट’ रूपांतून या कवितांमध्ये सहजरीत्या प्रकट होतात. म्हणूनच ‘नावीन्य किंवा नवीनता’ या कवितेचे महत्त्वाचे वैशिष्टय़ ठरते. कविता म्हणजे भरगच्च प्रतिमांचे आगर नव्हे. मात्र कवितेतील प्रतिमा या कवितेला आशयसौंदर्य बहाल करतात. प्रस्तुत संग्रहातील अनेक कविता विधानात्मक आहेत. मात्र या विधानांमध्ये असलेल्या प्रतिमांमुळे त्या विधानांचे काव्यमूल्य वृद्धिंगत होते. वानगीदाखल काही ओळी- पायरव नसलेल्या शांततेत, माणसांचा कचरा झाला, सृष्टीत फक्त वाळवंटच असतं असं नाही, ओअॅसिस फक्त वाळवंटातच असतं असंही नाही.
‘पाय नसलेली माणसं’मधील कविता ही जितकी आत्ममग्न आहे, तितकीच ती बाह्य जगाशी संवाद साधताना दिसते. हा विरोधाभासच तिला ‘आत्मपर भावकविता’ हे वैशिष्टय़ बहाल करतो. तिच्यामध्ये अंगभूत असलेला ‘सूचितार्थ’ तिच्या आशयाला ‘सार्वत्रिक, सामाजिक सत्य’ या पातळीवर नेतो. म्हणूनच या संग्रहातील कविता वाचताना ‘पाय नसलेल्या माणसा’च्या जीवन-विद्रोहात वाचकही गुंतून जातो.
संस्कृती, समाज, राजकारण, अर्थकारण, पर्यावरण, शिक्षण, नातेसंबंध या घटकांना कवेत घेणारी अशी ही कविता आहे. दुःख, निसर्गापासून तुटल्याची जाणीव, समाजाचे भंपक बुरखे पाहून आणि क्रूर वास्तव अनुभवून येणारी चीड, हताशा यांना आपल्यात झिरपवणारी अशी ही एका वेगळ्या पाऊलवाटेवरची भावकविता आहे. वानगीदाखल ही काही शीर्षकेः ‘प्रेषित स्वर्गात दिसून आला नाही’, ‘निसर्ग फुलवणाऱ्या कृत्रिम वेणा’, ‘या वर्तमानाचं काय’, ‘सपाटीला सर्वस्वी कारणीभूत’, ‘हो, मीच मारलं सूर्याला’, ‘सृष्टीचा आदिम पाय…’, ‘माणसाला वाटणार नाही माणसाची लाज’ इत्यादी.
या कवितासंग्रहातील कवितांमधून कवींची जीवनदृष्टी ही भोवतालाकडे सजगतेने बघण्याची आणि तो सहृदयतेने जाणून घेण्याची आहे. केवळ ‘बघ्या’ची भूमिका न घेता भोवतालातील घटनांचा कार्यकारणभाव तपासून त्याबद्दल कवितेतून सशक्तपणे भाष्य करण्याची ताकद या कवितेत आहे. मानवी जीवनाच्या वर्तमानाचा दस्तऐवज आहे. खरे तर एकूणच जीवन व्यवस्थेला अगणित अर्थहीन असे पायच पाय फुटलेले सध्या आपल्याला दिसत आहेत.
पाय नसलेली माणसं
कवीः सुधीर राजाराम देवरे
प्रकाशनः शब्दालय प्रकाशन
पृष्ठेः 175, किंमतः रु. 300




























































