
हिंदुस्थानने पारंपरिक व कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 7-1 गोल फरकाने चिरडत एफआयएच प्रो-लीग स्पर्धेत धडाकेबाज विजय मिळविला. सुरुवातीला पिछाडीवर पडलेल्या हिंदुस्थानने 7-1 गोलफरकाने बाजी मारत पाकिस्तानची दाणादाण उडविली.
सामन्याच्या 13व्या मिनिटाला अबू महमूदने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत पाकिस्तानला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. अवघ्या सात मिनिटांत हिंदुस्थानने जोरदार पलटवार करत सामना बरोबरीत आणला. 20व्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या पेनल्टी कॉर्नरवरील चेंडूला सुखजीत सिंगने अचूक मार्ग देत गोल केला आणि 1-1 अशी बरोबरी साधली.
हिंदुस्थानने बरोबरीनंतर मागे वळून पाहिलेच नाही. 26व्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरचे सोनं करत संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापूर्वीच पाकिस्तानवर दबाव वाढला होता. तिसऱया सत्रामध्ये हिंदुस्थानने सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले. 34 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकवर हार्दिक सिंगने तिसरा गोल झळकावला. त्यानंतर पाकिस्तानचा पेनल्टी कॉर्नर निष्फळ ठरल्यानंतर झालेल्या वेगवान प्रतिहल्ल्यात जुगराज सिंगने चौथा गोल ठोकत पाकिस्तानची बचावफळी उद्ध्वस्त केली.
41व्या मिनिटाला अभिषेकने अप्रतिम रिव्हर्स हिटद्वारे मैदानी गोल करत हिंदुस्थानची आघाडी 5-1 अशी भक्कम केली. त्यानंतर 44व्या मिनिटाला सलग मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरनंतर राजकुमार पालने रीबाऊंडवर गोल करत पाकिस्तानच्या जखमेवर आणखी मीठ चोळले. अखेर 54व्या मिनिटाला दिलप्रीत सिंगने मंदीप सिंगच्या अचूक पासवर सातवा गोल नोंदवत पाकिस्तानच्या पराभवावर अखेरचा शिक्का मारला.



























































