
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिर्डी येथे सोमवारी (दि. 29) जाहीर विराट सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिर्डीकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर भगवे ध्वज, आकर्षक स्वागतकमानी, पताकांची सजावट सुरू असून, शिर्डी भगवेमय झाले आहे. सर्वत्र जल्लोष सुरू असून, ठिकठिकाणी शिवसैनिकांची लगबग पाहायला मिळत आहे. दरम्यान, शिर्डीतील सभेत उद्धव ठाकरे गद्दारांवर काय हल्लाबोल करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून शेकडो चारचाकी, दुचाकी आणि बसचे ताफे शिर्डीकडे रवाना करण्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. शक्तीचे विराट प्रदर्शन घडवून आणण्यासाठी शिवसैनिक दिवस-रात्र मेहनत घेत आहेत.
सोमवारी (दि. 29) साकुरी येथील साई किमया लॉन्स येथे होणाऱ्या सभेसाठी शिवसैनिकांनी कंबर कसली आहे. गावागावांत बैठकांचे सत्र, वाहन नियोजन, संपर्क मोहीम आणि जनजागृती सुरू आहे. शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला भगिनी, तसेच सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सभेचे निमंत्रण पोहोचविण्यासाठी पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण जिह्यातील राजकीय विरोधकांचे लक्ष आता शिर्डीकडे लागले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कोते, जगदीश चौधरी, उपजिल्हाप्रमुख अमर कातारी, शहरप्रमुख अमित चव्हाण यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिक सभेच्या तयारीला लागले आहेत.
सध्याच्या राजकीय घडामोडींवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाषण विशेष महत्त्वाचे मानले जात आहे. सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करतानाच जनतेच्या प्रश्नांवरील भूमिका आणि आगामी राजकीय रणनीती याबाबत उद्धव ठाकरे काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे शिर्डीतील विराट सभा राज्याच्या राजकारणाला नवी कलाटणी देणारी आणि आगामी राजकीय समीकरणात बदल करणारी ठरेल, असा विश्वास शिवसैनिक व्यक्त करीत आहेत.



























































