
>> राजाराम पवार
पावसाळ्याच्या आगमनानंतर शहरालगतच्या डोंगरदऱ्या, गडकिल्ले, धबधबे आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळांकडे पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. हिरवा निसर्गात फिरताना पुरेशी काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे. पर्यटनाचा आनंद घेताना अतिउत्साह, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्याचा मोह तसेच अर्धवट माहितीच्या आधारे दुर्गम भागात जाण्यामुळे गंभीर दुर्घटनांचा धोका वाढत ये असल्याने पर्यटकांनी जबाबदारीने व सुरक्षिततेचे भान ठेवून पर्यटन व करावे, असे आवाहन पर्यटन व वन विभागाने केले आहे.
पावसाळ्यात निसर्ग आपले सर्वांत मोहक रूप धारण करतो. हिरवाईने नटलेले डोंगर, धुक्याची चादर पांघरलेले घाट, ओसंडून वाहणारे धबधबे आणि पावसाच्या सरींमुळे अनेक पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढत आहे. विशेषतः वीकेंडच्या काळात सिंहगड, कात्रज घाट, लवासा, राजगड, पुरंदर, तोरणा, लोणावळा, लोहगड, घनगड, मुळशी धरण, कामशेत परिसरातील वॉटर फॉल, धबधबे तसेच ताम्हिणी घाट आणि प्लस व्हॅली येथे पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. मात्र, या पर्यटनस्थळांवर काही पर्यटकांकडून बेशिस्तपणा, धोकादायक कड्यांवर जाऊन सेल्फी घेणे, सुरक्षेच्या सुचना दुर्लक्षित करणे, मद्यप्राशन करून हुल्लडबाजी करणे, अशा प्रकारांमुळे अपघात घडत आहेत. ओल्या दगडांवरून पाय घसरून गंभीर दुखापत होणे, दरीत पडणे, वेगवान प्रवाहात वाहून जाणे, धुक्यात वाट चुकून जंगलात अडकणे, यांसारख्या घटना वारंवार घडत आहेत.
अनेक पर्यटक सोशल मीडियावर पाहिलेल्या ठिकाणांवर कोणतीही पूर्वमाहिती न घेता जातात. स्थानिक मार्गदर्शक किंवा प्रादेशिक वन विभाग अधिकृत माहितीचा आधार न घेतल्यामुळे धुक्यात वाट हरवणे, मोबाईल नेटवर्क बंद पडणे किंवा मदत वेळेवर न मिळाल्याने अडचणी निर्माण होतात. त्यामुळे पर्यटनाला जाण्यापूर्वी संबंधित ठिकाणाची भौगोलिक माहिती, हवामानाचा अंदाज आणि सुरक्षित मार्ग यांची माहिती घेणे आवश्यक आहे. पावसाळी पर्यटनाचा आनंद घेताना निसर्गाचे संरक्षण आणि स्वतःची सुरक्षितता, याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे वन व पर्यटन विभागाने म्हटले आहे.
हवामान खात्यातर्फे रेड अलर्ट किंवा यलो अलर्ट जारी केला असल्यास संबंधित भागात अतिवृष्टी, ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे हवामान खात्याने अलर्ट जारी केला असताना पर्यटकांनी घाटमाथ्यावर, डोंगरदऱ्या-खोऱ्यांमध्ये, घनदाट जंगलाच्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच पावसाळी पर्यटन करताना विशेष खबरदारी घ्यावी.
आशीष ठाकरे, वन अधिकारी, पुणे.
पावसाळी पर्यटन करताना ही काळजी घ्या
- पर्यटनस्थळाची संपूर्ण माहिती घेऊनच प्रवास करा.
- हवामानाचा अंदाज तपासून नियोजन करा.
- धोकादायक कडे, दऱ्या व धबधब्यांच्या काठावर जाऊ नका.
- सेल्फीच्या नादात जीव धोक्यात घालू नका.
- ओल्या दगडांवर धावणे किंवा उड्या मारणे टाळा.
- स्थानिक प्रशासन व वन विभागाच्या सूचनांचे पालन करा.
- मद्यप्राशन करून पर्यटन करणे टाळा.
- घनदाट जंगलात किंवा अपरिचित वाटांवर जाऊ नका.
- आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ स्थानिक प्रशासन किंवा बचाव पथकाशी संपर्क साधा.

























































