आता सोसायट्यांमध्येच कचऱ्याची विल्हेवाट, पालिका देणार कंपोस्ट खत उपक्रमाला चालना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील सोसायट्यांमध्ये कचऱ्याच्या निर्मितीच्याच ठिकाणी विल्हेवाटीसाठी पालिका प्रोत्साहन देणार आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा-लवांगरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या उपक्रमात गृहनिर्माण सोसायट्यांमध्येच कंपोस्ट खत निर्मितीसारख्या प्रकल्पांना चालना देण्यात येणार आहे.

‘डी’ विभाग ग्रँट रोड येथील विभाग कार्यालयात लवांगरे यांनी भेट देऊन पाहणी करून कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी परिमंडळ-1 चे उपायुक्त चंदा जाधव, सार्वजनिक उपायुक्त शरद उघडे, सहायक आयुक्त संतोष साळुंके आदी उपस्थित होते. ‘डी’ विभाग कार्यक्षेत्र अंतर्गत असलेल्या ऐतिहासिक स्थळांचे व्यवस्थापन, रस्त्यांची स्थिती, घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कचऱ्याचे विलगीकरण, प्लॅस्टिक कचऱ्याचे निर्मूलन व प्रक्रिया, गृहनिर्माण संस्था स्तरावरील कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प, मॅनहोल्स सद्यस्थिती, सार्वजनिक आरोग्यविषयक बाबी, वृक्ष छाटणी, धोकादायक इमारती, पुरातन वारसा वास्तू आणि धार्मिक स्थळांसाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना, पावसाचे पाणी साचण्याची संभाव्य ठिकाणे आणि त्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना, स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे श्रीगणेशोत्सव मूर्ती विसर्जनानिमित्त पालिकेच्या वतीने पुरविल्या जाणाऱ्या विविध सोयी-सुविधा यासह सार्वजनिक आरोग्य विभाग यंत्रणांचे कामकाज, लसीकरण, कीटक निर्मूलन आदींचा सविस्तर आढावा या भेटीदरम्यान प्राजक्ता वर्मा-लवांगरे यांनी घेतला.