
प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पात बाधित होणाऱ्या किनारपट्टीवरील गावांना जेएनपीए प्रशासनाकडून विकासाची भरमसाट आश्वासने दिली होती. मात्र गेल्या अडीच वर्षांपासून धूप प्रतिबंधक बंधारे, रस्ते, पाणी, आरोग्य सुविधेसाठी जेएनपीए प्रशासनाने निधीच दिलेला नाही. फसव्या प्रशासनाकडून केवळ आश्वासनांची खैरात सुरू असून हा प्रकल्प आमच्या माथ्यावर मारू नका, असा इशारा देत वरोर, वाढवण, बहाड, गुंगवाडा, तडियाळे, धाकटी डहाणूसह परिसरातील अनेक गावांतील भूमिपुत्रांनी वाढवण बंदराला तीव्र विरोध केला आहे.
वाढवण बंदर बंदर प्रकल्पामुळे वरोर, वाढवण, बहाड, गुंगवाडा, तडियाळे, धाकटी डहाणू ही गावे पूर्ण बाधित होणार असून आजूबाजूची इतर गावे अंशतः बाधित होणार आहेत. प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पामुळे परिसरातील सुपीक शेती, बागायती, मासेमारी, डायमेकिंग व्यवसाय धोक्यात येऊन स्थानिक भूमिपुत्र उद्ध्वस्त होणार आहेत. मात्र जेएनपीए प्रशासनाने बाधित गावांतील ग्रामपंचायत क्षेत्रातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुविधा, मत्स्यव्यवसायाशी संबंधित पायाभूत सुविधा तसेच इतर मूलभूत विकासकामांसाठी भरघोस निधी तातडीने देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र दोन वर्षांच्या कालावधीत जेएनपीटी प्रशासनाने गावांचा सर्वांगीण विकास काहीच केला नाही. भूमिपुत्रांना नोकरी आणि रोजगारासाठी वारंवार मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले. एकीकडे बंदर प्रकल्पामुळे भविष्यात विस्थापन आणि बेरोजगारीचा सामना करावा लागणार असल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे तर दुसरीकडे विकासाच्या नावाखाली केवळ आश्वासनेच दिली जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
गेल्या अडीच वर्षांपासून आम्ही किनारपट्टीवरील चार ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थ मिळून जीएनपीएच्या कार्यालयाला भेट देऊन वाढवण बंदराच्या अनुषंगाने बाधित होणाऱ्या ग्रामपंचायतमध्ये धूप प्रतिबंध बंधारा तसेच गावातील विविध विकासकामे करण्यात यावीत याबाबत लेखी निवेदन दिले. मात्र जेएनपीए कार्यालयाकडून केवळ आश्वासनांची खैरात केली जात आहे. त्यामुळे वाढवण बंदराला आमचा तीव्र विरोध आहे. – शैलेश बारी, तडियाळे ग्रामस्थ
सर्वेक्षणासाठी आलेल्या दोन कर्मचाऱ्यांना फटकावले
वाढवण ते तवा या प्रस्तावित महामार्गासाठी सर्वेक्षण करण्याकरिता आलेल्या दोन कर्मचाऱ्यांना स्थानिक ग्रामस्थांनी चांगलेच फटकावले. जे. कुमार कंपनीचे हे हे कर्मचारी असून ते बेकायदेशीरपणे नेवाळे येथील हनुमाननगर परिसरात मोजणीसाठी आल्याचे आदिवासी एकता परिषदेचे कार्यकर्ते भरत वायडा यांनी सांगितले. स्थानिकांनी या कर्मचाऱ्यांना मारहाण केली असून याप्रकरणी १२ जणांविरोधात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला



























































